हरवलेले खेळ

          असंच परवा रात्री लहानपणात रमून गेलं असताना मनात एक विचार आला. लहानपाणी आपण किती तरी छोटे छोटे खेळ खेळलो. विषामृत, लीन्गोर्च्या, लपाछपी, गोट्या, विटी-दांडू, डबा-ऐसपैस, भोवरा... एक न अनेक.रोज वेग वेगळे खेळ खेळायचं ठरवलं असतं तर एखादा खेळ परत खेळण्यासाठी बरेच दिवस लागले असते. अजूनही आठवतं लपाछपी खेळताना, लपण्यासाठी ठरलेल्या, कोणालाही माहिती नसलेल्या त्या जागा, एकमेकांचे शर्ट घालून ज्याच्यावर राज्य आहे त्याला फसवणे.... भोवरा खेळताना,  मुद्दाम भोवरा लांब जाऊन फिरेल अशा पद्धतीने मारणे... डबा-ऐसपैस खेळताना सगळ्यांनी एकदमच डबा उडवायला जाणे... मग सगळ्यांना आउट करण्यासठी राज्य असलेल्याची तारांबळ उडणे. गोट्या खेळताना जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करणे....त्यातच झालेली त्यावेळची तात्पुरतीच पण कडाक्याची भांडणे. कागदाच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू होडी, विमान, कॅमेरा, बेडूक.... वगैरे बनवणे. शाळेची बस येई पर्यंत ते कागदाचे विमान हवेत भिरकावून त्याच्या मागे मागे पळणे. शिवणापाणी खेळताना गुढगा फुटलेला असताना सुद्धा त्याला औषध लावण्यासाठी आपल्यामागे बाबांनी केलेली ती पळापळ. किती तरी गोष्टी अगदी जशाच्या तश्याच आठवतात.  यादी करायला घेतली (आठवणनींची  आणि खेळांची सुद्धा)  तर नुसत्या यादीचाच लेख होईल. (एव्हाना तुम्हीही तुमच्या बालपणात रमून गेला असाल...लागलीच बाहेर या...नंतर निवांत परत जा). असो...लहानपणी केलेले हे उद्योग आता आठवले कि हलकेच चेहऱ्यावर हास्य तरळून जातं.
             पण सध्याच्या लहान मुलांना या गोष्टी माहिती सुद्धा नाहीत. आता हे खेळ खेळताना कोणीच दिसत नाही. मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट आणि फार फार तर फुटबाल अशी गत झाली आहे. अगदीच काही ठराविक ठिकाणी नाही म्हणायला कबड्डी आणि खो-खो खेळलं जातं, पण ते हि प्रमाणात. या पेक्षा हि वेगळे मैदानी खेळ असतात हे आताच्या मुलांच्या गावीही नसावं बहुतेक. कागदाच्या वस्तू बनवणे हे तर फक्त ओरिगामीच्या लोकांपुरता मर्यादित झालं आहे. घरात बसल्या बसल्या प्ले-स्टेशन, X-box , टीव्ही गेम्स या खेळानमध्ये आताची मुलं जास्त अडकून पडायला लागली आहेत. प्रतीठीत खेळांच्या या जरीदार चादरीने आपले जुने खेळ पुरते झाकून टाकले आहेत.
           बर याला कारणं काय काय असावीत असा विचार केला, तर लक्षात आलं कि मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानच कमी पडायला लागली आहेत. त्यात फ्लॅट संस्कृती सगळी कडे रुजत आहे. खेळण्यासाठी मैदानं आता राखून ठेवावी लागत आहेत. त्यातही मुलांना खेळण्यासाठी तासाला पैसे मोजावे लागतात. खेळण्यामध्ये सुद्धा लोकांनी पैसा आणि धंदा शोधून काढला आहे. आपल्या पाल्याने बाहेर कुठे खेळायला जाऊ नये आणि घरातच बसून काय ते खेळावे म्हणून त्याला घरात खेळता येतील असे खेळ आणून दिले जातात. या मागे हेतू दोन तीन असतात. एक तर आई वडील दोघेही कामाला जात असतात त्यामुळे बाहेर कुठे भटकण्यापेक्षा  मुल घरीच सुखरूप असलेलं बरं. त्यासाठी त्याला हवे ते घरीच आणून दिलं जातं. दुसरं म्हणजे काळजी, नुसतीच काळजी म्हण्यापेक्षा अति काळजी. मुल बाहेर खेळायला गेलं तर त्याला लागेल, मातीत हात खराब होतील वगैरे वगैरे.  त्यातूनही एखादा पालक जर मातीत खेळायला सोडत असेल तर त्याला ढीगभर नियम  असतात. चपलाच घालून जा, जास्त वेळ मातीत खेळू नकोस, आल्यावर हात पाय साबणाने धुवा....अशी यादी चालूच राहते. मुलं विचार करत असतील कि इतके नियम पाळण्यपेक्षा मातीत न खेळलेलं बर. हल्ली जिथे बांधकाम चालू असेल तिथे काम करणाऱ्या लोकांचीच मुलं काय ती मातीत खेळताना दिसतात.
          अजून एक कारण लक्षात घेण्या सारखं आहे. सध्याच्या मुलांना पालक कोणत्या न कोणत्या तरी शिकवणी मध्ये सारखच गुंतवून ठेवतात. कोणी कराटेच्या, कोणी नाचण्याच्या, कोणी चित्रकलेच्या, कोणी तबल्याच्या.. प्रत्येकाची वेगळी तऱ्हा. सगळ्याच पालकांना वाटत कि आपल्या पाल्याने काही तरी वेगळं करावं आणि त्यात कायम पाहिलं असावं. त्यासाठी ते आपल्या मुलां कडून कसून मेहनत करून घेतात. आधी शाळेत जायचं, मग खासगी शिकवणी (अभ्यासाची) आणि मग कोणत्या तरी कलेची शिकवणी. या शिकवणीच्या फेऱ्या मध्ये मुलांना वेळच मिळत नसेल बाकी खेळ खेळण्यात.      
          आणखी एक कारण जाणवलं कि आपल्या लहानपणी मैदानी खेळ जे होते ते साधारण वय वर्ष ७ ते १३ या वयो गटातील मुलं एकत्र खेळत होती. म्हणजे त्या खेळांचा वारसा हा मोठ्या मुलांकडून लहान मुलांकडे आपोआप जात होता, काहीही वेगळं न शिकवता. तो दुवा कुठे तरी तुटला. हळू हळू मुलं, बरोबरीच्या मुलां बरोबर जास्त वेळ घालवू लागली आणि मग कालांतराने तो वारसा लहान मुलांकडे गेलाच नाही.
      अशी बरीच कारणं असतील ज्या मुळे ते छोटे छोटे खेळ काळाच्या पडद्या आड गडप झाले आहेत. खरच आणखी काही वर्षांनी जिथे कुठे खेड्या पाड्यात ते खेळ आता सुद्धा जपले जात असतील तिथे तरी तग धरून राहतील का ???....  ते काहीही असो आपल्या हरवलेल्या खेळांची आठवण मात्र आपल्याबरोबर सदैव राहणार यात काही वाद नाही !!!

3 comments:

  1. छान आहे समीर. मलाही हल्लीची मुलं बाहेर खेळताना दिसत नाहीत. आम्ही लहानपणी खेळुन कहर केलाय. आई-बाबांचा मार खाल्लाय जास्त खेळण्यावरुन. आज तर आई-वडिल मुलाना बाहेर खेळण्यावरुन ओरडतात.

    कठीण आहे.

    आर जे

    ReplyDelete
  2. खरच, लहानपणी काय धमाल करायचे आपण, आज कालची मुलं व्हिडिओ गेम, कार्टुन मधुन बाहेर पडावी असे वाटते.
    मी लहानपणी "सिनेमा" (कृपया माझा ब्लॉग वाचा) हा खेळ खुप खेळायचो, किल्ला बनविणे, तंबुत राहणे असे खेळ खुप खेळायचो.

    मी हे खुप खुप मिस करतो.

    छान आहे तुमचा लेख, असेच लिहित रहा, शुभेच्छा...

    ReplyDelete
  3. विट्टी दांडु,कोया,गोट्या,रवणापाणी(फक्त पावसाळ्यात) राहिले की हो !

    ReplyDelete