किल्ले पुरंदर


आम्ही दोघांनी नवीन गाडी घेऊन महिना झाला होता पण अजून बाहेर हिंडायला गेलो नव्हतो, म्हणून गेल्या शनिवारी तुषारला फोन केला 

मी: काय रे काय करतोयस ?
तुषार: काही नाही रे !!!  आराम चालू आहे.
मी: चल मग उद्या कुठे तरी लांब भटकून येऊ. पालीला जाऊन येऊ.
तुषार: थांब जरा, तुला संध्याकाळी फोन करून सांगतो. 
मी: ठीके !!!

          आमच्या आळशी गड्याने (तुषार) संध्याकाळी फोन तर केला पण म्हणाला पाली नको, जवळच्या जवळ नारायणपूरला जाऊन येऊ. मी म्हणालो ठीके हे नाही तर ते. आपल्याला काय ??? दिवस कारणी लागल्याशी मतलब. सकाळी सकाळी ६.३० ला चांदणी चौकात भेटायचं ठरलं.
          ठरल्या प्रमाणे रविवारी सकाळी आम्ही ६.३० ला चांदणी चौकात भेटलो. बंगलोर हायवे ने, दोन बुलेट गाड्यांवर आरामशीर निघालो नारायणपूर कडे. वाटेत एके ठिकाणी मिसळपावचा समाचार घेतला. पोटोबा शांत झाले होते त्यामुळे दुपार पर्यंतची काळजी मिटली होती. 
रस्त्यावर येणारे जाणारे लोक वळून वळून बघत होते (आम्हाला नव्हे आमच्या गाड्यांना), जाम भारी वाटत होतं. सकाळ असल्यामुळे हायवेला गर्दीही फार नव्हती. ८.१५ ला आम्ही नारायणपुरात पोहोचलो. दर्शन घेतलं आणि तेवढ्यात आरती सुरु झाली. यथासांग आरती होई पर्यंत ९.०० वाजले. आता काय करायचा हा प्रश्न पडला. घरी परत जाण्याचा तर विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता. मग मीच म्हणालो आलोच आहोत तर जाऊयात पुरंदरला. काहीहि आढे-वेढे न घेता मावळा तयार झाला याचं मला जरा आश्चर्यच वाटलं. पण असो लागलीच गाड्या काढल्या आणि मागल्या रस्त्याने पुरंदरची वाट धरली. मागे पुरंदरला जेव्हा आलो होतो तेव्हा वर जाण्याचा रस्ता फारसा चांगला नव्हता पण आता एकदम झाक केला आहे.
 एकदम टाररोड. अर्ध्या तासातच वर पोहोचलो. वर जाता जाता मधेच एक फोटो सेशन झालं. नुसतच गडीवर भटकून यायचं असल्याने कॅमेरा आणला नव्हता म्हणून मग मोबाइलनेच फोटो काढायला सुरुवात केली.   पावसाळा संपून बरेच महिने उलटले आहेत हे जिथे तिथे जाणवत होतं.सगळीकडे एकदम रखरखीत. गडावर गेल्या गेल्या पहिला दृष्टीस पडला

 तो वीर मुरारबाजी देशपांड्यांचा पुतळा आणि त्यांची समाधी. ५ मिनिटे त्यांच्या स्मरणात घालवल्या नंतर पुढे निघालो. गाडी अजूनही बरोबर होती. पुढे बिन्नी दरवाज्यापाशी थोडा वेळ थांबलो. तिथेच मग शिवपर्वातल्या गप्पा सुरु झाल्या. त्या दरवाज्याची आजची अवस्था पाहता शिवकाळात इथून घोडे कसे वर येत असतील, इथे मावळे कसे लढत असतील याचं विश्लेषण सुरु झाले. गप्पा मारता मारता पुढे निघालो आणि एके ठिकाणी पोहोचलो जिथून गाडी पुढे नेता येत नाही.  गाडी लावली आणि गड चढायला सुरुवात केली. सुरुवातीलाच पुरंदरेश्वराचं  मस्त देऊळ आहे. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि वर चढायला सुरुवात केली. २०-२५ मिनिटातच "सर" दरवाजा सर झाला. चढता चढता पुरंदरच्या तहाचा इतिहास डोळ्या समोर तरळत होता. मुघल आक्रमण कुठून झालं असेल. त्यांचं सैन्य किती लांब पसरलं असेल. वज्रगडावरून तोफांचा हल्ला कसा केला असेल. आपल्या मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता किल्ला कसा लढत ठेवला असेल याची गोळाबेरीज मनात चालू होती. असो, सर दरवाजा ओलांडून पुढे आम्ही फत्तेबुरुजा कडे जायला निघालो. बुरूजा कडे जाताना पुरंदर एकीकडे, पुढच्या बाजूने भकास वाटत होता पण दुसऱ्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूला अजूनही थोडी हिरवळ मे महिन्या मध्ये जळण्यासाठी तग धरून होती. आता पर्यंत घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या.
 बुरुजाच्या टोकाला पोहोचल्यावर तिथे मस्त वारं सुटलं होतं. समोर वज्रगडाकडे पाहत थोडा वेळ तसाच उभा राहिलो. भर उन्हात सुद्धा तिथे थंडपणा जाणवत होता. पुन्हा माघे वळलो आणि सर दरवाजा कडे आलो. इथून पुढे आता केदारेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं. तटबंदी अगदी नावाला राहिली आहे. पुन्हा पायपीट सुरु झाली. पाय वाटेवर एकही मोठे झाड नाही. रणरणत्या उन्हात तटबंदीच्या कडे कडे ने एक एक बुरुज बघत केदारेश्वर मंदिर गाठलं.

 केदारेश्वराच दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथे सावलीला आराम केला.  आता परत जायची वेळ झाली होती. आल्या पावली परत जायचं असल्यामुळे आणि त्यात थोडासाच गड उतरायचा होता त्यामुळे फारसा वेळ लागला नाही. तडक खाली आलो. मधेच शोर्टकट मारल्यामुळे संभाजी महाराजांचं जन्म ठिकाण पहायचं राहून गेलं. गाडी लावली तिथे एक घर वजा हॉटेल आहे. भूक सणकून लागली होती. झुणका आणि भाकरीवर यथेच्छ ताव मारला. ताकाचे दोन दोन ग्लास रिकामे केले आणि बसलो गप्पा मारत. अर्धा पाऊण तास गप्पा झाल्यावर गाडीला किक मारली आणि कुठेही न थांबता थेट चांदणी चौक गाठला. पुन्हा चौकात एक एक कॉफी मारली आणि घरला आलो. रामनवमीचा दिवस आनंदात गेला होता :)