सांदण दरी

         "सांदण दरी", निसर्गाच एक अप्रतिम आणि वेगळच रूप. मागच्या महिन्यात सागरचा "सांदण दरी" बद्दल लेख misalpaav.com वर वाचला, त्यात सोबतीला लोकांना हेवा वाटावा म्हणून त्या बिलंदराने फोटो पण जोडले होतेच. फोटो इतके सुंदर होते कि पाहता पाहताच ती मनात घर करून बसली अन हिचं दर्शन घ्याला लवकरच जायचं असा मनात निश्चय करून टाकला. योगायोगाने चार टाळकी जमली आणि हिचा विषय निघाला. मग काय सगळेच भटक्या जमातितले लो़कं एकत्र अल्यावर जे व्हायच ते होणारच. एक रविवार सांदणच्या नावाने करून मोकळे झाले.
          ठरलेल्या रविवारच्या आदल्या दिवशीच, शनिवारीच,  हर्षदने फोन करून सांगितलं, "पहाटे पहाटेच ५.३० ला माझ्या घरा जवळ हजर होणार आहे, तयारीत रहा". फोनवर ते ऐकत असतानाच, माझा, आपल्याला आवरायला कमीत कमी किति वेळ लागेल आणि जास्तीत जास्त किती वेळ झोपता येईल याचा हिशोब सुरू झाला होता, आणि तो करण्याच्या नादात मि त्याला हो म्हणुन फोन ठेवला होता. असो.....रविवारी, पुण्यातून हर्षद आणि धम्या दोघेहि ठरल्या प्रमाणे वेळेवर आले. अर्थात थोडा उशिर झालाच, पण प्रवासात एखादा उशिर करणारा नसेल तर तो प्रवास कसला? वाटेत येता येता त्यांनी गण्याला, आणखी एका मावळ्याला पण उचलले. पुढे मि त्यांना सामिल झालो अन आम्ही सागर कडे गेलो. ज्या महामानवामुळे आमच्या मानगुटीवर हे सांदण दरीच भुत बसलं तो हा सागर. तर असे आम्ही पाच जणं, हर्षदच्या लाडक्या, पांढर्‍या शुभ्र पॅलियो मधुन तिच्या (दरिच्या) वाटेला लागलो.
                  मोशी मार्गे नाशिक रोडला लागल्यावर गाडी मस्त लोण्यासारखी सरकत असतानाच अचानक एका पेट्रोल पंपात घुसली.  घुसणारच, आधी गाडीची सोय बघायला हवी. त्यात हर्षदने सिओसिओच्या पंपावर पेट्रोल भरण्याचा आग्रह धरला होता. हे सिओसिओ  (कंपनी Owned कंपनी Operated) प्रकरण आम्हला नवीनच होतं ज्याचा खुलासा त्याने आधीच केला होता आणि तसा पंप त्याच्या तीक्ष्ण नजरेने ताडला होता. आमच्यासाठी तो पर्यंत सगळे पंप सारखेच होते.
तिकडे हर्षद पेट्रोल भरण्यात अडकला असतानाच इकडे सूर्याने आपली हजेरी लावली होती. लगेच कॅमेरा काढून तो क्षण साठवून ठेवला. गाडीचं पोट भरल होतं आणि घरी परते पर्यंत तिची काळजी मिटली होती. आता आमच्या पोटोबाचा विचार चालू झाला. सागर ने आधीच नारायण गावातील "राजकमल" मिसळचा उदो उदो केल्यामुळे पुढचा थांबा साहजिकच तो होता. म्हणून मग तिथून निघाल्यावर गाडी थेट राजकमलला थांबवली. सगळीकडे वेगवेगळ्या पाट्यांनी नटलेले ते दुकान पाहून पुण्यातल्या दुकानदाराला सुद्धा घेरी येईल असं होतं.
 बहुदा तो राजकमल वालाच पुणेकर  असेल त्याशिवाय एवढ जमणारच नाय. एक पण गिर्‍हाईक नसताना आमच्या पायगुणाने कि काय तिथे हि गर्दी जमली आणि आम्हालाच मिसळ उशिरा मिळाली. उशिरा का होईना पण मिसळ एकदम झक्कास होती. ती नसती तर सागरवर दिवसभर मुक्ताफळ उधळली गेली असती. मिसळीचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही तिथून निघालो. आता पुढचं लक्ष होतं अमृतेश्वराच देऊळ, रतनवाडी. गण्याचा एक मित्र (हृषीकेश) आम्हाला भंडारदराला भेटणार होता. त्याची (हृषिकेशची) चौकस बुद्धी त्याला गप्पं बसून देत न्हवती म्हणून तो सारखाच फोन करून आम्ही कुठे आहोत याची माहिती मिळवत होता. बहुतेक आम्ही त्याला टांग मारून परत पुण्याला जाऊ कि काय असं त्याला वाटत असावं अन इथे आमचा गण्या त्या बिचार्‍याला उगाच झापत होता. संगमनेरला पोहोचल्यावर नाशिक रोड सोडला आणि भंडारदरा धरणाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात धरण दिसू लागलं. धरणापाशी महाराज हृषीकेश आपल्या बाईकरुपी घोड्यावर तयारच होते. मग पुढचा प्रवास सुरु झाला. पुढे आमची पॅलियो आणि मागे एक घोडा. जाता जाता धरणाचे फोटो काढणे चालू होतेच. एका बाजूला महाराष्ट्रातील सर्वोच शिखर कळसुबाई, अलंग, मदन आणि कुलंग दिसत होते तर दुसर्‍या बाजूला रतनगड आणि आजोबा (हा म्हातारच पण माणूस न्हवे डोंगर आहे) दिसत होते. आम्ही आपला ते दृश्य बघत मधून सरकारच्या कृपेने केलेल्या मार्गावरून पुढे सरकत होतो. रतनवाडीला पोहोच्याला आम्हाला १२ - १२.३० वाजले. अमृतेश्वराच दर्शन घेऊनच पुढे साम्रदवाडीला जायचं होतं.

देवळात जाताना अगदी सुरुवातीलाच हत्तीशिल्प उभं आहे. एरवी तिकडे लक्ष हि गेलं नसतं, पण सागर ने त्याचं जे वर्णन सांगितलं ते ऐकून ते लगेच कॅमेरा मध्ये पकडून ठेवलं. शेजारचं चित्र त्याचंच आहे. पहा अर्थ लावता येतोय का तुम्हाला ते ? आणि लागला कि सांगा मला. अमृतेश्वाराचा देऊळ पाहिल्यावर केवळ अप्रतिम हाच शब्द तोंडातून निघतो. हे देऊळ ८ व्या किंवा ९ व्या शतकातलं असेल असं सांगून सागर ने आमच्या ज्ञानगंगेत आणखी एका ओंझळीची भर टाकली.  सुरेख कोरीव काम असेलेले ते हेमाडपंथी देऊळ आणि त्या वरची ती नक्षी पाहून त्या वेळची वास्तूकला कि प्रगत होती आणि आताची कशी त्या पुढे झक मारते याचा आणखी एकदा अनुभव आला.



देवळाचा गाभारा तसा लहानच आहे. आत महादेवाची पिंड  नेहमीपेक्षा वेगळी आहे, शिळेच्या वरच्या भागाला कमळाचा आकार दिलेला आहे. पुजारी सकाळीच पूजा करून गेला असावा असं ताज्या फुलांवरून कळलं. सहयाद्रीच्या डोंगर दर्यान मधून, आड वाटेवर, निर्जन ठिकाणी  अशी  कितीतरी लहान सान देवळं आहेत, जिथे अजूनही पूजा रोज नित्य-नेमाने केली जाते. यामुळेच बहुदा आपली संस्कृती जपली जात असावी  असा एक पुसटसा विचार मनामध्ये डोकावून गेला. असो... रतन गडावरून प्रवरा नदीचा उगम होतो अन इथूनच ती पुढे जाते हि आणखी एक माहिती मिळाली. आता हि कोणी दिली हे सांगायलाच नको. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही देवळाच्या मागच्या बाजूला गेलो. खरं तर तीच देवळाची पुढची बाजू वाटत होती, कारण त्या बाजूला मंडप होता. देवालयाचा मंडपही छान कोरला होता. मागे गेल्यावर रतनगड दिसला. तो दिसणारच आम्ही पायथ्याशीच तर होतो.
 आम्हाला वर येण्याचा आमंत्रण देत होता. पण आणखी एका बयेने आमचं लक्ष खिळवून ठेवलं होतं, जिच्यासाठी इथवर आलो होतो. अमृतेश्वराजवळच, मग एक फक्कडसा चहा मारला अन सुमारे तास भर तिथे घालवल्यावर आम्ही पुढे निघालो साम्रदला. पुढे अवघ्या ५-७ किमी अंतरावर हि छोटीशी वाडी आहे.  वाडीत पोहोचलो आणि एक छानसं झाड बघितलं, गाडी पार्क करायला (उगाच नको तिकडे तुमचे वारू उधळू देऊ नका). गाडीला तिच्या योग्यजागी लावून आम्ही निघालो दरी पाहायला. सागरला वाट माहित होतीच तरीही गावातली लोकं न विचारता रस्ता सांगत होती. एकूणच काय सागर बरोबर नेतोय का ? या प्रश्नाचं आम्हाला खात्रीलायक उत्तर आपोआप मिळत होतं.
                   सुरुवातीला माळरानावरून पायपीट केल्यावर पुढे थोडी झाडी लागली. झाडी संपून पुढे जाताच समोर आआ करून ती होतीच. आम्ही दरीच्या मुखाशी होतो. अहाहा काय नजरा होता तो. आणखी मैल दीड मैल आत आम्हाला खाली तिच्या गर्भात उतरत जायचं होतं. एकीकडे ते द्रुश्य बघत असताना दुसरीकडे हात मात्र फोटोग्राफिचे काम अगदी बिनबोबाट करत होते. दरीच्या सुरूवातिलाच एक पाण्याचा साठा आहे. अमच्या अयत्या गाईडवर विश्वास ठेवून आम्हि त्या थंडगार पाण्याचा अस्वाद घेतला. मनसोक्त थंड पाणी पिउन मोर्चा पुढे वळवला. जसं जसं खाली उतरत होतो तसं तसं बाजुचे कातळ कडे वर वर आकाशात जात होते. त्या दोन ऊंचच ऊंच कड्यांमधे साधारण १० फुट वगैरे जागा आहे. थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी वाट एकदम निमुळती आहे. आणी त्यात भरीस भर म्हणजे तिथे खड्डा आहे ज्यात पाणी साठलेलं असतं.

तो पार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पाणी पाहिल्यावर आमच्या गण्याला काय रहावलं नाय आणी त्याने यथेच्च तिथे डूंबुन घेतलं. धम्याला त्याच्या ऊंची मुळे, नाईलाजाने डूंबूनच ते पार करणे भाग होतं आणि हर्षद ने, अता भिजलोच आहे निम्मा, तर पुर्णच भिजावं असा चेहर्‍यावर भाव आणून पाण्यात बुडी मारली. एक एक करून, कुठे कंबरे एवढ्या तर कुठे खांद्या एवढ्या, त्या गारगार पाण्यातून सगळ्यांनी तो अडथळा पार केला. ( पावसाळ्या मधे तर त्या पाण्याची पातळी नक्किच वाढत असेल. ज्याला पोहोता येत असेल तोच पुढे जाण्याचं धाडसं करेल अशी जागा आहे ती. तर तिथे पावसाळ्यात जाण्याची इच्छा असल्यास आधी पोहायला शिकावे.)  त्या दोन कड्यानमध्ये खोल खाली गेल्यामुळे उन असूनही छान गारवा जाणवत होता. माती हा प्रकार मुळात तिथे न्हवताच, बघाल तिकडे दगड अन धोंडे.
 आपल्या पुर्वाजान्सारख्या उड्या बर्याच ठिकाणी माराव्या लागल्या. त्या निमित्ताने त्यांचे काही गुण, अजूनही आपल्यात आहेत याची जाणीव प्रत्येकालाच झाली. गणेशा, सागर आणि हृशिकेष यांना दरीचा शेवट पाहाण्याची फार घाई झाली असल्यामूळे ते खुप पुढे निघून गेले होते. आमची वाटचाल मात्र निवांत हत्तीच्या चालीने, आजू बाजूच्या त्या नैसर्गिक भिंती पहात पहात चालली होती.
एका ठिकाणी चांगला सपाट दगड बघुन हर्षद पसरला. अर्थात त्याने त्या आधी, त्याच्या मध्ये (दगडामधे) त्याला (हर्षदला) सामावून घेण्याची आणि त्याच वेळेला पेलण्याची ताकद आहे कि नाही याची खातरजमा करून घेतली होती. पसरल्यावर सुद्धा त्याचा कॅमेराशी खेळ चालू होताच. तो परसलाच त्यासाठी होता. वर दिसणारी फट आणि त्यातून दिसणारं ते आकाश त्याला टिपायचं होतं. चांगलं मैल दीड मैल खाली उतरल्यावर एका ठिकाणी वाट अवघड होते. जिथून पुढे सामान्य माणसाला जाता येत नाही. त्याला आम्ही तरी कसे अपवाद असणार. पण तरीही जित्याची खोड, जरा अजुन पुढे शक्य होतं तितक्या खाली जाऊन आलोच. सकाळी निघताना, ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं तो शेवटचा बिंदु आम्ही पहिला होता. अता परतिची वाट धरायची होती.
बराच वेळ तिथे घालवता येणार न्हवता कारण सागरने आधिच सांगुन ठेवलं होतं, "हिच दरी आपल्याला पुन्हा वरून पण पहायची आहे". जेवढं पुढे चालत दरीत आलो तेवढंच मागे मुखापाशी जाऊन परत वरून (कड्यांवरून) तेवढंच चालायचं होतं आणि त्यासाठीच तो लवकर निघा म्हणुन मागे लागला होता. पुन्हा इथे येण्याचं मनाशी ठरवून तिथून निघालो. परत वर येताना पुन्हा ति पाण्यातली कसरत केली अनि दरीच्या सुरूवतिला पाण्याच्या साठयापाशी आलो. इतका वेळ पोटोबा शांत बसून सगळं सहन करत होते पण अता असह्य झालं होतं. ईडली चटणीचा डबा बरोबर आणलेला होताच, त्यावर मनसोक्त ताव मारला. शेजारी असलेलं थंड पाणी पिऊन ताजेतावाने झालो. खाल्यामुळे अता जीवात जीव आला होता आणि परत तेवढंच चालायचं बळंही. मग काय लगेच उठून, अता वरच्या दिशेने चालायला लागलो. दरीला उजवी कडे ठेवून आणि रतनगडाला डावी कडे ठेवून आम्ही मार्गस्थ झालो. दरीच्या शेवटा पर्यंत यायला, यावेळेला आम्हाला मुळीच वेळ लागला नाही. थोडा वेळ तिथे घालवून आम्ही परत निघालो.















वाटाड्या होता हृशिकेष. जस आलोय तसच परत जायचं आहे, म्हणून आम्हीही जास्त विचार न करता त्याच्या मागे मागे चालू लागलो. दरीच्या सुरुवातीला येई पर्यंत सगळं ठिक होतं पण जसं त्या सुरुवातिच्या झाडीत घूसलो तसा अमचा वाटड्या चूकला. गप्पांच्या नादात आम्ही पण लक्ष दिलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा वेळ निघून गेली होती. बरचं चालल्यावर अखेच आम्हाला रस्ता दिसला. आम्ही साधारण किलोमिटर भर पुढे चालत गेलो होतो. हृश्याला शिव्या देत देत माघारी आलो. यावेळी आम्ही रस्ता सोडला नाही. गाडी जवळ आल्यावर थोडा आराम केला. सुर्य मावळतीकडे झूकला होता. ५ वाजून गेले होते. पुन्हा एकदा निश्चित यायचं ठरवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. अता लवकरात लवकर पूणे गाठायचं होतं. भंडारदरा धरणाजवळ एक मोराचं जोडपं दिसलं. ते सुद्धा अगदी रस्त्याच्या जवळ. गाडी हळू केली पण क्षण काही टिपता आला नाही. आमचं पांढरं धुड बघून, घाबरून, ते झाडात गडप झालं. असो... पुढे मग संगमनेर मधे चहा घेतला आणि जेवायला आळेफाट्याला थांबायचं ठरलं. तिथे पोहोचायला ९.०० वाजले. सागरच्या कृपेने 'हायवे हॉटेल हेमंतचं'  "रद्दड", हो रद्दडच जेवण जेवलो आणि घरी रात्री १.३० ला परतलो. सागरच्या सुचविण्यामुळेच, रात्रीचं जेवण सोडलं तर दिवस खरोखरच सत्कारणी लागला होता. परत सांदणला जायचं आहे, बघु अता कधी मुहूर्त लागतो ते !!!


5 comments:

  1. as usual mastch lihile ahes, pan te je kay dadavun thevale ahe na te lihile aste tar lokana pan samajle aste tya sagar ne toola pan asech code ghatale aste tar? tyane kase sangitale sagel tyala je je mahit hote te, pan lihile ekdam bhari ahes tyamule kadhihi na aikalele ani pahilele navin thikan parat amhi dakshinechya trip sarkhe kurchit basun enjoy kele tya baddal dhanyavad. asech pude chan chan vachayla milo hi ishwar charani prarthana.........jai maharashtra.........

    ReplyDelete
  2. एकदम जबरा वर्णन केलेय हो मनराव. आपण तर तुमचे फ्यान आता.

    ReplyDelete
  3. अतिशय सुरेख आणि व्यवस्थित वर्णन. मुद्देसुद. माझ्या लेखनाचा ढिसाळता हा जन्मजात गुंण आहे., या साठी तुला गुरु केला समीर.

    ReplyDelete
  4. mastach re mast aahet pics pan ,,, sahich lihileyas :) :)

    ReplyDelete
  5. Khup bhari jamun alay. Pics apratim ahet..
    Mepan lavkarach plan karun ikade bhatkun yeycha :)

    ReplyDelete