ठरल्या प्रमाणे सकाळी लवकरच ६.०० ला रामेश्वरकडे प्रस्थान केलं. आम्ही आणि  आमची गाडी दोनीही, एक दिवस पूर्ण विश्रांती मिळाल्यामुळे एकदम ताजेतवाने  झालो होतो. मुक्कामा दिवशीच गाडी मधलं तेल बदलल्यामुळे (oil  change केलं,  तेल म्हंटल कि काही लोकांना झेपत नाही  ;) )  पुढे घरी पोहोचे पर्यंत  गाडीची काळजी मिटली होती. अता पुढचा ३१४ किमी चा रस्ता खेड्यापाड्यातून  जाणारा होता पण त्यातही उत्तम बाजू  हि होती कि रस्त्यावर एकही खड्डा  नव्हता. अख्खा रस्ता एकदम चकाचक. दोनीही बाजूला हिरव्यागार झाडांची जागा  अता ओसाड माळ रानाने घेतली होती. केरळ तसा पूवर बेट सोडल्यावरच संपला होता  पण रामेश्वरला जाताना आपण तमिळनाडूत आहोत हे जरा जास्तच जाणवलं.
लांब-लांब  पर्यंत माळ रान आणि मधून जाणारा अरुंदच पण काही त्रास न देणारा रस्ता.  मंगलोर मध्ये धक्के खात गाडी चालवण्याच्या पुढे हा अनुभव म्हणजे आमच्यासाठी  आणि गाडीसाठी मेजवानीच होती. पुष्कळ ठिकाणी असंख्य पवनचक्क्या आढल्या.  माळराना वरती सुटणाऱ्या वाऱ्याचा जोर ओळखून सरकारने त्याचा चांगलाच फायदा  घेतला आहे.
१५-२० मिनिटे तिथे घालवल्यावर पुढे आम्ही रामेश्वर देऊळाजवळच जाऊन खोली  बघितली. मस्त फ्रेश होऊन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला गेलो. देऊळ खूपच सुंदर  आणि प्रचंड आहे.
लांबच लांब प्रसादातून पुढे गेलं एक भला मोठा नंदी आपलं  लक्ष वेधून घेतो. एवढा नंदी मी आधी पहिल्या नसल्यामुळे तो माझ्या चांगलाच  लक्षात राहिला. गर्दी नसल्यामुळे काहीही गडबड, धाकाबुक्की न होता आत गेलो  आणि महादेवाचं शांत मनाने दर्शन घेतलं, घेतलं म्हण्यापेक्षा झालं. सगळं  मंदिर पाहून बाहेर यायला आम्हाला एक दीड तास लागला. बाहेर आल्यावर  अभ्याच्या डोक्यात खरेदीचं भूत घुसलं आणि लेकाने ढीगभर माळा, कानातले,  ब्रेसलेट्स वागिरे खरेदी केली. कोणा-कोणासाठी काय काय घेतलं याची चांगली ४-५ वेळा उजळणी झाली. मीही मग वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि थोडी  खरेदी करून घेतली. उगाच ऐन वेळी घोळ नको म्हणून रूमवर गेल्या गेल्या पठ्याने लगेच  सगळं वेगवेगळ पॅक करून ठेवून दिलं.
          दुपारी जेवणाची वेळ निघून गेली होती पण तरी पोटाला आधार असावा  म्हणून एका  हॉटेल मध्ये गेलो. दक्षिण भारतातील जेवणाची पद्धत अता पर्यंत फक्त ऐकली  होती पण स्वतःच्या डोळ्याने पहिल्यांदाच बघत होतो. आमच्या समोरच एक बाई  जेवायला बसलेली. मनगटा पर्यंत भाताने भरलेला हात, टेबल वर पसरलेलं केळाच  पान आणि त्यात जेवढे पदार्थ होते त्यांचं एकत्र केलेलं मिश्रण. पोटात  गेल्यावर वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्र काय होतं हे मला पोटाच्या बाहेर दिसत  होत. ती आपली निवांत तळ हातात मोठा घास घेऊन तो फिरवून फिरवून मोठा गोळा  बनवून तो हलकेच तोंडात ढकलत होती. आईग..!!! तीचा तो पवित्रा बघून अर्धी भूक  गायब झाली होती. थोडा वेळ थांबून तिचं जेवण होण्याची वाट पहिली आणि मग  जेवायला बसलो. आम्ही जेवायला बसलो आणि आणखी एक दक्षिणी कुटुंब शेजारच्या  टेबल वर आसनस्थ झालं. पुन्हा सगळं आठवलं पण नशीब चांगलं होतं. मनगटा  पर्यंत हात भरवण्या पर्यंतच त्यांची मजल गेली होती आणि बाकी काही ताटाचा  राडा केला नव्हता. जेवण व्यवस्थित पार पडलं.
             अता आम्हाला जायचं होतं धनुष्कोडीला.  धनुष्कोडी !!!,  भारताचं असं टोक, जिथून लंका  सगळ्यात जास्त जवळ आहे. इथेच रामसेतू बांधून श्रीरामांनी लंकेत प्रवेश केला  होता. धनुष्कोडीला जातानाच तिथला भकासपणा आणि भयाणपणा जाणवत होता.  रस्त्याचा दुतर्फा पसरलेली समुद्राची वाळू आणि त्यात उगवलेली वेड्या  बाबळीची झाडं, त्या वेळेला (श्रीराम आले तेव्हा) कस वातावरण असेल याची  पुरेपूर जाणीव करून देतात. धनुष्कोडी पर्यंत जायला रस्ता नाहीये तर त्याच्या आली कडे ३ किमी पर्यंत  डांबरी रस्ता आहे. पुढे समुद्र किनार्याने चालत (अथवा डेरिंग करून गाडीने)  जावं लागतं. आम्हाला डांबरी रस्ता संपतो तिथे पोहोचायलाच ५ वाजले  होते.  पुढचा ३ किमीचा प्रवास पायी करायचा होता पण सूर्य मावळायच्या  आत परत येणं  शक्य नव्हत. गाडीने तसंच पुढे जायचा एकदा विचार मनात आला पण दुसऱ्याच क्षणी  गाडी अडकली तर काय ??? या विचाराने त्याची जागा घेतली आणि पुढे जायचा  अट्टाहास डोक्यातून काढून टाकला.  
अता पर्यंत लवकर उठून कलती मारण्याची आम्हाला सवय लागली होती. तसंच प्रकार  या वेळी सुद्धा केला, सकाळी ६.०० लाच रामेश्वर सोडलं. त्या दिवशी आम्हाला  वाटेत मदुराई  बघून, गाठायच होतं मुन्नार. परत एकदा ३०० किमी पेक्षा  जास्तचा पल्ला पार करायचा होता. रस्ता साधा सरळ असल्यामुळे काहीच अडचण  नव्हती. नुसती गाडीची मूठ पिळणे एवढंच काय ते काम होत.
 मध्ये एकदा दोनदा  चहा प्यायला थांबलो, तेव्हाच शेजारी उभ्या असलेल्या ट्रकला बघून अभ्याला  फोटो काढायची एक कल्पना सुचली आणि मी ती पूर्णत्वास पण नेली. शेजारच्या  ट्रक वर चार राज्यांची नावे लिहिलेली होती, आमची गाडी पुढे आडवी लावून  कॅमेरा रस्त्याच्या पलीकडे ठेवून बरोबर वेळेवर  फोटो काढला. जी राज्ये आम्ही गाडीखाली तुडवली होती, त्यांचा असा फोटो मिळाला.  असो... पुढे  अंदाजे १०.३० ला आम्ही मदुराई मध्ये पोहोचलो. मदुराईच मीनाक्षी मंदिर म्हणजे वास्तू  कलेचा अप्रतिम नमुना आहे. चार दिशेला  चार गोपुरं आहेत. त्यावर कोरलेल्या मुर्त्या इतक्या जवळ जवळ आणि सुंदर आहेत  कि त्या कशा कोरल्या असतील या विचारत माणूस बुडून जातो.
| We crossed that | 
देवळात फिरताना  लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात पाहिलेलं मीनाक्षी मंदिर आठवलं. आपण हे देऊळ  कधी पाहणार ?  हा तेव्हा पडलेला प्रश्न अता सुटला होता. मंदिर बघून झाल्यवर  बाहेर आलो आणि परत खरेदीचा मुहूर्त लागला. कांजीवरमच्या साड्यांसाठी  हे शहर प्रसिद्ध असल्यामुळे घरातील महिला मंडळासाठी खरेदी झाली. लगेच फोन करून घरी  कळवून टाकलं त्यामुळे तिकडे हि आनंदी आनंद झाला. मदुराईतून आम्ही २.०० ला  मोर्चा वळवला मुन्नार कडे. वाटेत 'थेनी'ला मस्त जेवण केलं. मुन्नारच्या  दिशेने दौड सुरूच होती. मुन्नार मध्ये चहाचे मळे आहेत हे माहित असल्यामुळे  कधी एकदा मुन्नार येतंय असा झालं होतं. रस्त्यावर दोनीही बाजूला झाडी सुरु  झाली त्यावरून कळलंच कि दोन दिवस तमिळनाडू पालथा घालून आम्ही परत केरळ  मध्ये प्रवेश करणार होतो. समोर डोंगर दिसत होते, ज्यांच्या पलीकडे होतं  मुन्नार !!!, निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. घाट सुरु झाला  तेव्हा तिथे बोर्ड वाचला १९ किमी घाट, सावधानतेने गाडी चालवा. पण पाहतो तर  मुन्नार येई पर्यंत घाटच होता. अरुंद रस्ता, एका बाजूला खोल धुकं पसरलेली  दरी आणि दुसर्या बाजूला उंचच्या उंच कातळ कडा. एखाद मोठ वाहन पुढून आलं कि  अगदी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवायची, वाहन क्रॉस झाला कि पुढे जायचं, हा  खेळ बर्याच वेळा करावा लागला. आम्ही इतक्या उंची वर पोहोचलो होतो कि  ढगातून गाडी चालवत  होतो. काही ठिकाणी तर समोरचं अगदी १५-२० फुट अंतरावरच  दिसत होत.
दुपारी मदुराई मध्ये आम्ही घामाच्या धारांनी ओले चीम्ब्ब  भिजलेलो तर अता आम्हाला थंडी वाजायला लागली होती. काही तासांच्या फरकाने  सगळा परिसर आणि वातावरण पार बदलून टाकलं होतं. घाट सुरु झाल्या पासून २०-२५  किमी नंतरच चहाचे मळे दिसायला सुरुवात झाली आणि मुन्नार येई पर्यंत ते  दिसतच होते. तब्बल ५५-६० किमी घाटातून वाट काढत आम्ही मुन्नारला  संध्याकाळी ६.३० ला पोहोचलो. १२ तसा पेक्षा जास्त वेळ प्रवास झाला होता पण  ते शहर आणि तिथला वातावरण बघून सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला होता. अता  शोध सुरु झाला राहण्यासाठी. बरच शोधल्यावर एका ठिकाणी एकदम झक्कास रूम  मिळाली, अगदी LCD टीव्ही सकट. रूम मध्ये पंखा नावाचा प्रकार नव्हता. रूम  मधेच काय तिथे कुठेच नव्हता. एकदम थंडगार वातावरण. तो दिवस संपला होता.  मस्त जेवण केलं आणि उबदार पांघरूण घेऊन झोपी गेलो.
           दुसरा दिवस मुन्नार मधेच घालवायचा ठरवलं होतं म्हणून मग मुन्नार जवळच ४०  किमी वर टॉपस्टेशन नावाचं ठिकाण आहे, तिथे जाण्याचं ठरलं. सकाळी सगळं आवरून  मस्त इडलीचा नाश्ता करून टॉपस्टेशन कडे गाडी हाकायला सुरुवात केली. 
गाडीची नोंदणी  केली आणि अनामलाई टायगर रिझर्व मधून बाहेर पडलो. मयसूर जवळ आलं तरी अजून आम्ही तमिळ नाडू मधेच कसे हा प्रश्न पाडला  होता. तमिळनाडू - कर्नाटक सिमे वर आणखी एक जंगल आमची वाट पाहत होतं. जंगल  सुरु झाला आणि आमची नजर चारी बाजूंचा वेध घेऊन लागली. दाट हिरवीगार शाल  पांघरलेली जमीन एवढंच काय ते आम्हाला दिसत होतं. जस जस पुढे जात होतो, एक  मोठा डोंगर जवळ येत होता. पायथ्यापाशी गेलो तेव्हा कळलं कि हा  प्रचंड  मोठा घाट चढून पलीकडे जायचे आहे. घाटामध्ये U आकाराची २७ वळणे, त्यात  प्रत्येक वळण घेतलं कि समोर एकदम चढा रास्ता.
वरतून येणारी मोठी वाहनं,  जोरात येत होती आणि वळणावर कचकन ब्रेक दाबून वळत होती. एक एक वळण घेत आम्ही  हळू हळू घाट चढलो. मधेच एका ठिकाणी जाता जाता एक साप दिसला पण गाडी तेव्हा  थांबवली नाही. वर पोहोचलो तर भवानीसागर धरणाच्या जलाशयाच अप्रतिम दृश्य  दिसलं. मन प्रसन्न झालं. वाटलं आता बहुतेक घाट पण संपला आणि जंगल पण संपलच.  म्हणून मग तिथेच दोन चार क्लिक्स मारले, थोडं वेळ घालवला आणि कॅमेरा ठेवून  दिला. पुढे निघालो तरी दुतर्फा झाडी होतीच. रस्ता चकाचक असल्यामुळे गाडीचा  काटा हळू हळू ६० वर, मग ७० वर, मग ८०-८५  पर्यंत पोहोचला होता. निसर्गाचा  आनंद घेत जात असतानाच एकदम समोर एक हरीण आलं, मस्त एकदम तगडं. क्षणात गाडी  थांबली (डिस्क ब्रेक ची कृपा) आणि त्या घाबरट जीवाकडे पाहताना कॅमेरा  काढायची धडपड चालू झाली. ते आपलं त्याच्या सवयी प्रमाणे आमची चाहूल घेत  थोडंसं बिचकून परत झाडांमध्ये आल्या वाटे परत गेलं. आमचा कॅमेरा वेळेवर  तयार नव्हता, त्या हरीणाच नशीब चांगलं होतं :). या सगळ्यामध्ये मधेच कधीतरी  आम्ही कर्नाटकात प्रवेश केला होता. दुपार झाली होती, जंगल पण संपला होता,  पोटातले कावळे ओरडत आहेत हे आता जाणवायला लागलं होतं. पुढे पुढे जात होतो  पण एकही हॉटेल दिसत नव्हतं. हिरवागार परिसर सुद्धा ओसाड वाटायला लागला  होता. भूक लागली कि माणसाला काही सुचत नाही म्हणतात ते हेच. अखेर एका  ठिकाणी आम्हाला, आता पर्यंत नेहमीचा मेनू असलेलं जेवण मिळालं. मसाला डोसा  इतका आवडला, एकदम दोन खाल्ले. पोटोबा शांत झाले होते. पुढचा प्रवास लवकरच  संपला आणि आम्ही मयसूरला ४.०० वाजता पोहोचलो. हॉटेल शोधण्याचा काम पटकन  आटपल. एका रिक्षावाल्याला पकडलं, ज्याने झक्कास मध्ये मेन रोड (जिथून सगळं  काही जवळ असत) वर एका हॉटेल मध्ये नेलं. रूम आवडली, लगेच बुक केली. फ्रेश  झालो आणि मयसोर मध्ये चक्कर मारली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे पुण्यातील  लक्ष्मी रोड सारखं स्वरूप त्या रोडने घेतलेलं. जागोजागी फुटपाथ वर लोकांनी  छोटे छोटे स्टॉल लावलेले. जोतो आपलं दुकान मांडून गिऱ्हाईक शोधण्यात आणि  हाताळण्यात गुंग होता. रस्त्यावर गाड्यांची गर्दी आणि फुटपाथ वर माणसांची  गर्दी एकमेकांशी स्पर्धा करत होती.
असा माहोल  असताना मधेच एक ६-७ हत्तींचे आगमन  झाले. त्यांच्या बरोबर पोलिसांची जीप. अख्या रोडवरून चक्कर मारून ते हत्ती  आले तिकडे परत निघून गेले. सगळं काही परत जैसे थे. आम्ही रूम वर परत आलो  आणि 'दबंग' बघायचं ठरवलं. जवळच एक चित्रपटगृह होतं, म्हणालो ना आधीच मेनरोड  आहे, सगळं काही जवळ ;), रात्री ८.०० चा शो. झक्कास मध्ये 'तेरे मस्त मस्त  दो नैन' बघितला आणि रूम वर येऊन जेवलो. जेवणाची ओर्डर आधीच दिल्यामुळे  काहीच ताप नव्हता. दुसऱ्या दिवशी मयसोर बघायचं होतं त्याचा प्लान करून  निद्रादेवीची आराधना करायला गेलो.
                  सकाळी सकाळी उठून जाऊन चामुंडीचा दर्शन घेतलं. देऊळ डोंगरावर आहे. मयसोर  पासून ८ किमी. टिपिकल दक्षिण भारतीय मंदिर. कोरीव काम उल्लेखनीय. आधी  बऱ्याच जणांच्या फोटो मध्ये पाहिलेला मयसोर मधला राक्षस इथला आहे हे समजलं. 
चामुंडी पाहून झाल्यावर पुढे गेलो श्रीरंगपट्टनमला, टिपू सुलतानला  भेटायला. जाताना गाडीच्या मीटर कडे नजर गेली आणि ३००० किमीचा प्रवास पूर्ण झाल्याचं लक्षात आलं. श्रीरंगपट्टनम मध्ये प्रवेश केला आणि सगळ्यात आधी बघितलं ते  रंगनाथस्वामी मंदिर. मंदिरात सगळीकडेच देवांच्या लहान मोठ्या मूर्ती आहेत.  चुना आणि माती वापरून बनवल्या असतील असे वाटते. पुष्कळ जुनं मंदिर आहे हे  मंदिर फिरून आल्यावर लगेच कळत. पुढे आम्ही मग कैद्यांना ठेवण्यासाठी केलेलं  जेल पाहिलं आणि दर्यादौलत पाहायला गेलो. दर्यादौलत, लाकडाने आणि विटांनी  बांधलेला टिपू सुलतानचा आवडता महाल. आता त्याच म्युझियम मध्ये रुपांतर  करण्यात आलं आहे. सगळं कसं एकदम टापटीप ठेवलं आहे. 
| दर्यादौलत | 
 आत गेल्यावर टिपू ने  केलेल्या लढायांची चित्र रेखाटली आहेत. त्याचे वझीर, महत्वाचे सैनिक,  त्याची मुले, त्याने निर्माण केलेले  वेग वेगळे गड यांची त्या काळी  इंग्रजांनी काढलेली चित्रे प्रदर्शनात ठेवली आहेत. चांगलं एक दीड तास तो  माहाल पाहण्यात गेल्यावर आम्ही गुम्बज पाहायला गेलो. गुम्बज मध्ये टिपू  सुलतान, त्याचे वाडी हैदर आली, त्याची आई आणि त्याच्या नातलगांची कबर आहे.  या ठिकाणी सुद्धा स्वच्छता  छान राखली आहे. श्रीरंगपट्टनम पाहून झाल्यावर  आम्ही परत मयसोर मध्ये आलो, मयसूर पॅलेस बघायला.
 पॅलेस खूप मोठा आहे. मयसूरच्या राज्यांची शान काय होती, हे त्या राजवाड्या मधली प्रत्येक वस्तू  सांगते. अगदी सुरुवातीलाच आत जाताना काळ्या कुट्ट रंगाच्या १५-२० लहान तोफा  ओळीने ठेवलेल्या आहेत. तिथून आत गेल्यावर भलं मोठ  आंगण दिसत, अंगणात  तीनीही बाजूंनी वाड्यात प्रवेश करायला रस्ता आहे. प्रत्येक रस्त्याला दोन  कठडे आणि त्यावर सिंह डरकाळी फोडत उभे आहेत. भिंतींवर अनेक प्रकारची चित्रं  काढलेली आहेत. राजांना भेटायला आलेले फ्रेंच, पोर्तुगीज आणि त्यांच्या मागे त्यांचा  लवाजमा कसा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राजांची आणि त्यांच्या  महाराण्यांची चित्रे आहेत. एका ठिकाणी  पाहुण्यांसाठी केलेला, ९ भक्कम  खांबांचा आधार दिलेला आणि २५-३० फुट उंच असलेला हॉल आहे.  हॉलच्या मधोमध एक  खूप मोठ झुंबर सोडलेलं आहे. सगळं काही बघत बघत आपण येतो ते दरबार जमत होता  त्या ठिकाणी. 'मुगले-ए-आजम' चित्रपट जर पहिला असेल तर त्यात भरलेला जनता  दरबार जसा दाखवला आहे अगदी तसाच दरबार इथे आहे. इथल हे दालन पाहिलं कि त्या वेळेला दरबार कसा भरत असेल याची कल्पना आपण  नक्कीच करू शकतो. मयसूरचा राजवाडा पाहून झाल्यावर परत रूम वर येऊन आराम  केला.
             सायंकाळी झक्कास पैकी एक चहा मारून मयसूरच प्रसिद्ध वृंदावन गार्डन पाहायला  गेलो. वृंदावन गार्डन, कृष्णराजासागर धरणाच्या शेजारी बनवलेलं आहे. भरपूर  मोठी बाग कारंज्यांनी नटलेली आहे. 
 बागेत गेलो तेव्हा सूर्य पश्चिम  क्षितिजावर मावळती कडे झुकत चालला होता. जाता जाता त्याने आभाळावर तांबड्या  रंगाच्या शेड्स मध्ये मस्त पैंटिंग तयार केलं होतं. सूर्य धरणाच्या  भिंतीपलीकडे खाली गेला, अंधार झाला आणि अख्या गार्डन मध्ये विद्युत  दिव्यांची रोषणाई झाली. कारंज्यानमध्ये सुद्धा दिवे लावलेले आहेत. रात्र  झाली तशी बाग आणखीनच खुलून निघाली. बाग एका छोट्याश्या तळ्याने दोन  भागांमध्ये विभागलेली आहे. आम्ही सूर्य  मावळायच्या आधीच बागेच्या एका टोका पर्यंत गेलेलो. आता जायचं होतं दुसऱ्या  टोकाला. निवांत रंगीबेरंगी कारंजी पाहत आम्ही तळ्यापाशी आलो. बोट मधून  दुसऱ्या भागात जायची सेवा आहे. लगेच बोटमध्ये बसून पलीकडे. 
 पलीकडे पण  सारखच दृश्य. दोनीही टोकाला संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे आहेत  (आपल्या इथे बऱ्याच वेळा गणपती मध्ये देखावा असतो तसेच). एका करंज्यापाशी उभे राहिलो पाण्याचं ते एक दोन गाण्यांसाठी नृत्य बघितलं आणि तिथून परतीच्या  प्रवासाला निघालो. मयसूर शहर तसं बरच लांब आहे. येतानाच एका पंजाबी  ढाब्यावर धावा बोलला. ढाब्याची तिथली रीतच न्यारी होती. एका मोठी जागा  तारेच्या कुंपणाने बंदिस्त करून घेतलेली, त्यात छोट्या छोट्या झोपड्या  केलेल्या. गिऱ्हाईक आलं कि त्याने गाडी सकट झोपडी पाशी जायचं. गाडी लावायची  आणि जेवायला आत. आम्हीही मग आमची गाडी अशीच एक मोकळी झोपडी पाहून उभी केली  आणि आत गेलो. झोपडीत आपण काय जेवत आहोत आणि कोणाबरोबर जेवत आहोत एवढं  दिसण्या पुरता एकच छोटासा  मिणमिणता दिवा लावलेला. आमच्या पाठोपाठ लगेचच एक  हिरो  आलाच आणि ओर्डर घेऊन गेला. काही क्षणातच ओर्डर घेऊन गडी परत हजर.  एवढी तत्पर सेवा मी कोणत्याही हॉटेल मध्ये पहिली नव्हती. अस्सल पंजाबी जेवण  होतं. पनीर-बटर आणि रोटी खाल्ली, आपोआपच 'लाजवाब' शब्द तोंडातून बाहेर  पाडला. त्यांचा स्वयपाकी नक्कीच कोणी तरी पंजाबी असावा  (हल्ली कोणीही पंजाबी बनवतं म्हणून म्हणालो, त्यात आम्ही दक्षिणेत होतो), त्या छोटूला ज्यादा  टीप देऊन आम्ही तिथून तृप्त मानाने निघालो. हॉटेल वर पोहोचायला उशीर झाला  होता. दुसऱ्या दिवशीची तयारी केली आणि गाढ झोपलो. 
        अता आमच्या ट्रिपचा चौदावा दिवस होता. मयसूर सोडून शक्य होईल तेवढं अंतर  कापून कोल्हापूरच्या जितकं जवळ पोहोचता येईल तेवढं पोहोचायचं असं आधी  ठरलेलं. पण ज्या रिक्षावाल्याने हॉटेल दाखवलं त्याला जाता जाता आम्ही मयसोर  मध्ये बघण्यासारख्या गोष्टी आधीच विचारून ठेवल्या होत्या. त्यानुसारच  जाताना वाटेवरच असणारं आणखी एक चांगलं ठिकाण, गोमतेश्वर (बाहुबली) !!!  पाहायचं ठरवलं. 
सकाळी आवरून हॉटेल मध्ये खाली रेसेप्शनला आलो तर कौंटरवरचा माणूस ढाराढूर  झोपला होता. गदागदा हलवून त्याला उठवलं, उरलेले पैसे ताब्यात घेतले आणि  खुशाल झोपायला सोडून तिथून कल्टी मारली. रात्रभर उडालेली धूळ खाली बसली असल्यामुळे हवा स्वच्छ आणि शुद्ध, वातावरणात  छान गारवा, हळू हळू जागी होणारी जनता, नुकताच तांबड फुटलेल... अशा  वातावरणातच आम्ही श्रावणबेलागोलाला निघालो होतो. डोंगरावरची  भगवान  बाहुबलीची साधारण ७० - ८०  फुट उंच मूर्ती दिसायला लागली तेव्हा घड्याळाचा काटा ८.००  वाजलेले दाखवत होता. त्या प्रसन्न वातावरणात, आम्ही  तासाभरातच  श्रावणबेलागोलाला पोहोचलो होतो. पोहोचताच पाहिलं काम पोटभर नाश्ता करून  घेतला कारण समोरचा डोंगर चढून जायचं होतं. अंगात जीव असला आणि पोटातभर गेली  कि माणसाला चेव येतो आणि मोठं डोंगर छोटा दिसू लागतो. तसच आमचं पण झालं,  अर्ध्यातासातच आम्ही वर पोहोचलो होतो. 
दहाव्या शतकातलं ते शिल्प, १०००  वर्षे उलटून सुद्धा अगदी कालपरवा बांधल्यासारखं दिसत होतं. १९८१ साली या  वास्तू ला १००० वर्षे पूर्ण झाली. दर १२ वर्षांनी इथे मोठा उत्सव होतो,  ज्यात बाहुबलीवर वेगवेगळ्या पदार्थांचा (दुध, हळद, कुंकू वगैरे...) अभिषेक  केलं जातो. घरी जाता जाता इतिहासाचा हा अनमोल ठेवा पाहायला मिळाल्यामुळे  आनंद हि झाला होता आणि तो दिवस अगदीच रिकामा न जाता कारणी हि लागला होता.  लोकल माणसाला तेही रिक्षावाल्यासारख्या खडा-न-खडा माहिती असेलेल्या माणसाला  विचारल्याचा खरच फायदा होता. श्रावणबेलागोलातून निघायला आम्हाला १०.३०  वाजले. अता आमचं टार्गेट होतं NH4 ला लवकरात लवकर जाऊन मिळायचं. खेड्या मागून  खेडी, शहरा मागून शहरं जात होती पण NH4 येतच नव्हता.
 अखेर पुणे-बंगलोर हायवेला येऊन मिळालो. हायवे वर येताच पहिली  पाटी दिसली, "पुणे-६८२ किमी". दोन आठवडे जे नाव कुठेच दिसलं नव्हतं ते अता  दिसलं होतं. वाचता क्षणीच लय भारी वाटलं. अता रोड शोधायचं आणि तो कसा असेल  हे कल्पना करायचं काहीच टेन्शन नव्हतं. मस्त ४  पदरी मार्ग लांबच लांब सरळ गेलेला होता. वाटेत एका ढाब्यावर मस्त जेवण केलं  आणि निघालो. रानेबेन्नुरला राहायचं ठरवलं होतं पण ते जवळ आल्यावर कळलं,  शहर रोड सोडून ८ किमी आत आहे. ५.३० वाजले होते, आधीच गाडी चालवून चालवून  कंटाळा आला होता. हायवेला हॉटेल शोधत होतो पण एकही मिळालं नाही. पुढच्या  शहराची पाटी वाचली "हवेरी - २६ किमी". तसच आणखी पुढे जायचा निर्णय झाला आणि  हवेरी मध्ये ६.०० - ६.३० ला पोहोचलो. निघाल्यापासून १२ तास उलटून गेले  होते. एक स्वस्त आणि मस्त हॉटेल मिळालं. फ्रेश झालो आणि पोटाची खळगी भरायला  गेलो. जेवण चांगलं मिळेल म्हणून एक झक्कास दिसणाऱ्या हॉटेल मध्ये गेलो. पण आमचा  अपेक्षाभंग झाला. दिवसभराच्या प्रवासानंतर , बाहेरून चांगलं दिसणाऱ्या त्या  हॉटेल ने आमच्या जेवणाची सुद्धा वाट लावली. असो.. हवेरी मध्ये असताना आणखी  काय मिळणार अशी मनाची समजूत काढून आम्ही हॉटेल वर गेलो अन गप पडलो, झोप  कधी लागली हे कळलं नाही.
                 सकाळी लवकर प्रवास सुरु करायची सवय चांगलीच अंगवळणी पडली होती. तीच सुरु ठेवून आम्ही रुटीन प्रमाणे त्या दिवशीही सकाळी ७.०० ला हवेरीतून मुक्काम हलवला, कोल्हापूर  आणखी ३०० किमी होतं. "अब आखरी दो दिन का सफर बाकी रह गया था !" घरी लवकर  जायची ओढ लागली होती. रोड चांगला असल्यामुळे सुसाट निघालो होतो. तास दीड  तास गाडी चालवल्यावर नाश्त्याची वेळ झाली तेव्हा हॉटेलची शोधाशोध सुरु  झाली. अजून आम्ही कर्नाटकातच होतो. कुठे तरी इडली-वडा मिळेल तर शप्पत.. पण  हायवे म्हणजे खरच हायवे आहे. लांब लांब पर्यंत एकही हॉटेल नाही :(.
 नशिबाने  एक हॉटेल दिसलं.. मस्त गाडी लावून, हेल्मेट वागिरे ठेवून आत गेलो अन आत  गेल्यावर कळलं फक्त पोळी भाजीच जेवण आहे. सकाळ सकाळ जेवण :o, आल्या पावली  माघारी फिरलो, न खातापिता हॉटेल सोडून गाडी काढण्याचं जीवावर आलं होतं,  अभ्या कडे गाडीची चावी फेकली आणि बसलो माघे. बरंच पुढे गेल्यावर मना सारखं  हॉटेल आणि नाश्ता दोनीही मिळालं. तरतरीत होऊन पुढचा प्रवास सुरु केला.   कोल्हापूर जवळ येत चाललं होतं, MH पासिंग असलेल्या गाड्या दिसायला लागल्या  होत्या, पाट्या वरून पाट्या मागे सरकत होत्या, एक एक किलोमीटर ने आम्ही  महाराष्ट्राच्या सिमे जवळ येत होतो. अन ती आलीच. 
महाराष्ट्र सरकार ने आमचं  सहर्ष स्वागत केलं. एवढी मोठी स्वागताची जय्यत तयारी केलेली पाहून लई भारी  वाटलं, नाही तर आमचं स्वागत कोण करणार... असो..आम्ही आमच्या मातृभूमीत,  आमच्या कर्मभूमीत प्रवेश केला होता. कोलापुरात १२.०० ला पोहोचलो आणि गाडी  नेली थेट फडतरे मिसळ कडे. कोल्हापुरात येऊन मिसळ न खाणे म्हणजे अपराधच आहे  आणि तो मला करायचा नव्हता. मिसळ हाणली आणि मग अभ्याच्या घरी गेलो. इकडे  अभ्याच्या घरी आधीच त्याचे गाडीवर हिंडण्याचे पराक्रम कळले होते. पण आता  काय उपयोग होता, आम्ही सुखरूप घरी आलो होतो. पुढे मग दुपारभर अभ्याच्या भाच्ची बरोबर दंगा   करण्यात वेळ घालवला.  संध्याकाळी जाऊन अंबाबाईच दर्शन घेतल. देवळात काहीच गर्दी नव्हती, डोळे  भरून देवीच्या सजवलेल्या मूर्ती कडे पाहत राहिलो. १० मिनिटांनी तिथून  निघालो आणि घरी आलो (आता घर होतं, रूम नव्हती). जेवण केलं आणि ढारा-ढूर  झोपून गेलो.
            अता राहिला होता शेवटचा दिवस. मला एकट्यालाच कोल्हापूर वरून पुण्याला जायचं  होतं. अभ्याचा एक मित्र त्याची गाडी घेऊन वीकेंडसाठी कोल्हापुरात आलेला.  च्यायला !!!  सगळे एक-सो-एक नग या अभ्यालाच बरे भेटतात. ट्रीपच्या  सुरुवातीलाच एक भेटला होता अन अता शेवटला एक भेटला. तर त्यामुळे आमच्या कडे  दोन गाड्या झाल्या, म्हणून मग आणखी एक दिवस घरीच राहून अभ्या उशिराने  त्याची गाडी घेऊन निघणार होता. मग काय मी निघालो पहाटे पहाटे ७.३० ला  त्याच्या घरून. एकटाच असल्यामुळे कानाला झक्कास मध्ये रेडियो लावला आणि  सोडली गाडी वाऱ्यावर. मध्ये एक दोन ठिकाणी चहा प्यायला थांबलो तेवढच. 
पुण्याच्या थोडं अलीकडे,  ४००० किमी खंप्लेट झाले आणि लैच म्हणजे लैच भारी  फिलिंग आलं बगा. लागलीच कॅमेराने अमच्या दोघांचे (माझे आणि गाडीचे एकत्र)  फोटो काढले. हुशार  कॅमेरा हाय, स्वताच फोटो काढतो...;).  कोल्हापुरातून  निघाल्यापासून तीन तासात घरी पोहोचलो. 
गाडीला तिच्या हक्काच्या जागी लावली.  वर गेलो आणि बेल वाजवली, आईने दार उघडलं... एकमेकानकडे बघत आम्ही  नुसतं  हसत होतो. एवढे दिवस न चुकता रोजच्या रोज घरी फोन होत होता, पण तरी सुद्धा  तेव्हा झालेला आनंद असा शब्दात सांगता नाही येणार. असो...दक्षिण भारत ठरवला  तसा पहिला होता. १६ दिवसाचा उत्तम प्रवास, अनेक अनुभवांसह निर्विघ्नपणे  झाला होता.
समाप्त