(या १५ दिवसात इतके अनुभव गाठीशी बांधले आहेत कि सगळेच लिहायला घेतले तर पुस्तक लिहून होईल...तरी, काही मोजकेच लिहून ठेवतो आहे, न जाणो कोणाला त्याचा काही फायदा होईल.)
तर साधारण, वर्षभर अधी अभ्याचा एक मित्र, गाडीवर कन्याकुमारीला गेला आणि परत येताना बाईक सकट रेल्वेने आला. त्याने काढलेले फोटो पहिले आणि केरळच्या प्रेमातच पडलो. तेव्हाच फोटो पहाता पहाता अभ्याला सांगून टाकलं "पुढच्या वर्षी आपण केरळला नक्की जायचं, software release झालं कि लगेच !!!". अता अभ्या कोण ??? हे "software" हा शब्द वाचताच, तुमच्या तीक्ष्ण बुद्धीने लगेच ताडलं असेलच... पण तरीही सांगतो... तो माझ्या बरोबरच माझ्यासारखाच काम करणारा so called संगणक अभियंता. तर पुढे, दिवसा मागून दिवस निघून गेले पण आमच्या डोक्यातला किडा काय गेला नाही, मधेच एका दिवशी जुलै मध्ये, जोशात येऊन आम्ही एक कच्चा आराखडा तयार केला. त्यात महत्वाचे टप्पे आणि राहण्याची ठिकाणं तात्पुरता ठरवून घेतली. त्यावर आमच्या सुपीक डोक्यात आधीच आणखी एक कल्पना रूजली होती ती म्हणजे अख्खा प्रवास बाईक ने करायचा. येऊन-जाऊन साधारण ४००० किमी.
पुढच्याच महिन्यात कंपनी मध्ये सांगून टाकलं आणि जय्यत तयारी चालू केली. कच्चा मार्ग तयार असल्यामुळे कुठे थांबायचं आणि काय बघायचं हे नक्की करायला जास्त वेळ लागला नाही. कंपनी मध्ये आम्ही जाणार हे कळल्या नंतर, आमच्यावर सल्ल्यांची नुसती आताशबाझी सुरु झाली. पंक्चरच समान बरोबर घ्या... दोन बाईक न्या... हॉटेल बुक करा... मेक्यानिक कडे जाऊन थोडं फार शिकून या... एक न अनेक. पण या सगळ्या साल्यांना आम्ही आधीच सखोल विचार करून फाटे दिले होते आणि ठरवून टाकलं होतं, एकच बाईक न्यायची आणि बरोबर असलं फालतू समान घेऊन उगाच वजन वाढवायचं नाही, गरज आहे तेवढंच समान घ्यायचं. त्यामुळे महिनाभर 'नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे' याचा पुरेपूर अनुभव मिळाला.
अखेर तो दिवस उजाडला, ९ सप्टेंबर २०१०....पहिला मुक्काम होता अभ्याच्याच घरी... कोल्हापूरला... दुपारी ३.३० ला निघायचं ठरलं. सकाळी कंपनी मध्ये थोडा वेळ जाऊन आलो (उगाच आम्हाला कंपनीची आणि कामाची किती काळजी हे दाखवण्यासाठी) आणि दुपारी ठरल्या वेळेला निघालो. निदान ५०० किमी चिंता नसावी म्हणून आधीच गाडीची टाकी फुल करून टाकली. घरातून बाहेर पडताच, अभ्याने एक काम सांगून धक्का दिला. "आपल्याला पुण्यात (गावात) जाऊन मग पुढे जायचं आहे ". हे ऐकताच गावातलं ट्राफिक डोळ्यासमोर उभं राहिलं आणि अभ्याला शिव्या देणं चालू झालं. आदल्याच दिवशी अभ्याच्या मित्राने फोन करून सांगितलं, 'येताना अप्पा बळवंत चौकातून एक पुस्तक घेऊन ये' आणि आमच्या पठ्याने त्याला आणतो असं वचनही देऊन टाकलं होतं. या करणाने अभ्यावर मुक्ताफळ उधळण्याचा कार्यक्रम कात्रज घाट येई पर्यंत चालू होता. कात्रज घाटा पासून खरी प्रवासाला सुरुवात झाली. आपण काही तरी वेगळं आणि नवीन करणार आहोत आणि त्यात बरच काही शिकायला मिळणार आहे या भावनेने आमचा उत्साह द्विगुणीत झाला होता. पावसाळा चालू असल्यामुळे चोहीकडे हिरवगार सौंदर्य पसरलं होतं. मधेच एखादी पावसाची सर पडून जात होती. समोर मोकळा रस्ता आणि असं वातावरण, गाडी चालवण्यासाठी आणखी काय हवं !!!, त्या वेळी झालेला आनंद असा शब्दात बांधताच येणार नाही, तो फक्त अनुभवता येईल. मस्त सुसाट निघालो आणि तीन तासात कोल्हापूर गाठलं.
कोल्हापुरात पोहोचलो तेव्हा फ्युएल इंडिकेटर टाकी रिकामी झाल्याचा संकेत देत होता आणि हे पाहून आम्ही दोघेही बुचकळ्यात पडलो होतो. फुल केलेली टाकी अपेक्षे पेक्षा खूप आधी रिकामी झाली होती. मग कारणमीमांसा सुरु झाली ती त्याच्या घरी पोहोचे पर्यंत चालू होती. शेवटी एका ग्यारेज वाल्याला पकडून गाडी दाखवली, "म्हणाला ८०-९० ने गाडी माराल अन ते बी डबल-शिट तर मग दुसरं काय हुणार."... हे ऐकल्यावर जरा बर वाटलं आणि गाडीत आणखी काही प्रोब्लेम नाही याची खात्री करून घेतली. सुरुवात तर एकदम दमदार झाली. आमच्या बाजीरावने आणखी एक पराक्रम केला होता, 'गाडीवर कन्याकुमारीला' जाणार आहोत हे घरी सांगितलं नसल्यामुळे, वाटेत त्यांचे डोस मला चालूच होते, घरी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचा चांगलाच पाढा वाचून घेतला गेला माझ्या कडून. अभ्याच्या घरी हो ला हो म्हणत, जास्त बडबड न करता वेळ घालवला, रात्री मस्त कोल्हापुरी जेवण केलं आणि आडवे झालो.
दुसरा दिवस होता माडांच्या देशाचा (गोव्याचा). पहाटेच उठून, सगळं आवरून आम्ही सकाळी ६.०० लाच कोल्हापूर सोडलं. सकाळच्या थंड वातावरणाचा आणि कोवळ्या उन्हाचा आनंद घेत आंबोली घाटात पोहोचलो. तिथे वेगळच चित्र दिसलं, दाट धुकं पसरलेलं होतं, समोर फक्त २०-२५ फुट पर्यंत दिसत असताना गाडी चालवत होतो. डोळे आणि गाडी वळेल तीकडे तोंडातून फक्त अहाहा !!! एवढाच शब्द बाहेर पडत होता. घाट माथ्यावर थोडा वेळ थांबून ते सृष्टीसौंदर्य मनसोक्त डोळ्यांनी पिऊन घेतलं. तेव्हाच क्लिक क्लिकटाला सुरुवात झाली. तिथून निघालो आणि मग वाटेत वाट्टेल ते फोटो काढत सुटलो. काही नमुने खाली टाकले आहेत.
रमत गमत घाट उतरलो आणि थांबलो ते थेट सावंतवाडी मधेच. मस्त पोह्यांचा नाश्ता केला, अमृतप्राशन केलं आणि निघालो. साधारण ११.०० ला गोव्यात पोहोचलो आणि गाडी नेली कलंगुट बीचला. कलंगुट बीच काही खास वाटला नाही पण गोव्यातून फिरताना गोवाफील जो यायला हवा तो आला. झाडून सगळे जण अर्धी चड्डी घालून हिंडत होते, अगदी शेंबड्या पोरा पासून आजोबां पर्यंत. यात मुली सुद्धा होत्या हे वेगळं सांगायला नको [;)]. बीचला पोहोचल्यावर गाडीला लावलेली मोठी बॅग खांद्यावर घेतली, पण काही अंतर चालून गेल्यावरच खांदा ओरडायला लागला... तेव्हाच ठरवलं कुठेही अधेमध्ये हिंडायला जाताना गाडीची मोठी बॅग गाडीलाच ठेवायची. बीच वरच जेवण केलं, एक तास भर घालवला आणि स्वारीने पुढे आग्वाद किल्ल्याच्या दिशेने कूच केले. किल्याजवळ पोहोचलो, आता प्रश्न होता गाडी लावण्याचा आणि फुकट कोणी तरी गाडी कडे लक्ष ठेवणारा शोधण्याचा. पण तो प्रश्न लगेच सुटला, एका चहा वाल्या काकूंच्या गाडी जवळ गाडी लावली आणि तिच्या कडून चहा घेतला. फुकटात गाडी आणि बॅग दोघांकडे लक्ष ठेवण्यासाठी माणूस मिळाला म्हणून आम्ही निश्चिंत मनाने किल्ला पाहायला गेलो. किल्ला सगळा पाहून झाला, तसा फार काही खास नाही, पण तिथून दिसणारा अथांग समुद्र बघत रहावासा वाटतो.
पुढे अमीर खानच्या आत्म्याला बर वाटावं म्हणून आणि म्हणूनच 'दिल चाहता है' पोज मध्ये काही फोटो काढले आणि आग्वाद किल्याला टाटा केला. आमचं राहण्याचं ठिकाण ठरलं होतं, पालोलेम बीच, गोव्याच शेवटचं टोक. आणखी बराच पल्ला गाठायचा होता. गोव्यामध्ये बहुतेक ठिकाणांच्या पाट्या होत्या पण अंतर किती हे लिहिलेलं नव्हत [:o]. बहुतेक गोवेकरांना सांगायच होतं, "अंतर जाणून घ्यायचं असेल तर जाऊन बघा". असो...आम्ही पालोलेम बीचकडे गाडी दामटवली आणि ३.३०-४.०० ला इच्छित स्थळी पोहोचलो. लगेच रूम बुक केली आणि बीच वर फिरायला गेलो. काय नयन रम्य दृश्य होत बीच म्हणजे, ते फक्त तिथे जाऊनच बघावं आणि अनुभवाव. संपूर्ण वेळ आम्ही तिथे घालवला, तो कसा गेला हे लिहायलाच नको इथे.
सूर्यास्त बघून आम्ही परत आलो आणि जेवायला एका हॉटेल मध्ये गेलो. जिकडे तिकडे फिरंगीच जास्त दिसत होते. मस्त जेवण करून परत रात्री बीच वर गेलो, तिथे एक मुलगी साधारण आमच्याच वयाची मस्त बॅले डॅन्स करत होती. अप्रतिम नाचत होती, तो नजारा अजून सुद्धा डोळ्यासमोर आहे. बराच वेळ नाचून झाल्यावर ती आणि तिच्या मैत्रिणी निघून गेल्या. मग मी आणि अभ्या परत आमच्या रूम वर आलो आणि झोपलो. रात्रीत मधेच एक ग्रुप आला आणि शेजारच्या रूम मध्ये थांबला. त्यांचा कलकलाट सुरु झाला आणि झोप मोड झाली. मुल-मुली गोंधळ घालत होती, आम्हाला धड झोपहि येत नव्हती आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या सारखाच गोंधळहि घालता येत नव्हता. तिसरा दिवस आमची वाट बघत होता, तसेच पडून राहिलो आणि पहाटे कधीतरी डोळा लागला.
तिसरा दिवस होता मंगलोरच्या नावावर. सकाळी ६.०० ला गोवा सोडलं आणि मंगलोरचा रस्ता धरला. आमचं मार्ग होता NH17 आणि NH47. भारताचा पाचीम किनारा न सोडता थेट कन्याकुमारी पर्यंत समुद्र बघत किनाऱ्या किनाऱ्याने जायचं आम्ही ठरवलं होतं. गोवा सोडलं आणि लगेचच पाऊस सुरु झाला. दोनीही बाजूला हिरवीगार झाडी आणि मध्ये सामसूम रस्ता, त्यातच कोसळणारा धो-धो पाऊस. रस्त्यावर पावसामध्ये गाडीवर जोरात जाणारे आम्ही दोघेच. असा आमचा प्रवास साधारण १.३० तास चालला. कारवार मध्ये नाश्ता केला आणि मग न थांबता गोकर्ण महाबळेश्वर गाठलं. सुंदर मंदिर आहे गोकार्णाच आणि आत गाभार्यात गेल्यावर गोकर्ण महाबळेश्वर का म्हणतात हे पिंडीच दर्शन घेतलं कि लगेचच कळत. पिंडीच्या मधोमध शिळे ऐवजी गायीच्या कानाचा आकार असलेला एक खड्डा आहे. फोटो काढण्यास परवानगी नाही आणि असती तरी काढला नसता, कारण ते आवर्जून जाऊन पाहण्यासारख आहे. गोकार्णाच दर्शन घेऊन पुढे आम्ही निघालो मुरुडेश्वरला. कधी एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार वनराई तर कधी दोनीही बाजूला झाडीच झाडी असा एका मागून एक रस्त्याचा खेळ चालूच होता. साधारण ११.०० ला आम्ही मुरुडेश्वरला पोहोचलो. मुरुडेश्वर...!!! माणसाने पाहावं अस आणखी एक महादेवाचं देऊळ. फोटो पाहून तुम्हाला समजल असेलच. त्यावर आणखी काय लिहिणार.
असो...मुरुडेश्वर पाहून आम्ही निघालो मंगलोरकडे. आमच्यासाठी नियतीने आधीच स्वागताची तयारी करून ठेवली होती. मंगलोर पर्यंतचा रस्ता म्हणजे खरोखरच शिक्षा होती. "हवासे बाते करनेवाली मेरी गाडी बडे बडे खड्डोसे बाते कर रही थी". तासाला ३० किमी एवढा कमी वेग आतापर्यंत कधी बघितलाच नव्हता. कर्नाटक सरकारला शिव्या देत देत, आम्ही फार कष्टाने रस्ता कापला. जर कोणाला शिक्षा द्यायचीच वेळ आली तर त्याला या रस्त्या वर चारचाकी घेऊन पाठवायचा असा ठराव पण आम्ही संगनमताने मंजूर करून टाकला. कसे बसे आम्ही ४.०० ला मंगलोरला पोहोचलो. आता प्रश्न होता मुक्कामाचा, काहीच विचार न करता समोर जे पाहिलं हॉटेल दिसेल त्यात घुसायचा निश्चय केला, हायवे जवळच तो तडीसही नेला. एकदम ताजेतवाने होऊन मंगलोर बघायला बाहेर पडलो. मायाजाला वरून माहिती काढली होती त्या प्रमाणे आधी 'सुलतान बात्तेरी'ला जायचं ठरलं. पण तिथे गेल्यावर अपेक्षा भंग झाला, फारच बकवास ठिकाण होतं जे पाहून अभ्याचं तोंड सुटलं आणि वाट्टेल ते बडबडायला लागला. अभ्या हाताबाहेर जायच्या आतच तिथून पुढे सरकलो आणि गोकरनाथ देऊळ बघायला गेलो. देऊळाबाहेर पोहोचताच अभ्या ताळ्यावर आला. भव्य मंदिर आहे गोकरनाथचं, कोरीव नक्षीकाम आणि आखीव रेखीव मूर्त्या असलेले कळस खूप सुंदर आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार चालू असावा कारण सगळीकडे संगमरवरी लावण्याचा काम चालू होतं.
पुण्यातून निघतानाच ठरवलं होतं, सूर्यास्त रोज समुद्रावरच बघायचा. समुद्र किनारी सूर्यास्त बघण्याची मजा काही औरच म्हणून मंदिर बघून आम्ही गेलो तन्निर्भावी बीच वर. मस्त चटपटीत कणीस घेतलं आणि बसलो खात, त्या तेजोवलयाकडे डोळे लावून. बाजूलाच चार- पाच मुलं, खेकड्याच्या पिलाला पकडण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा तो चिमटीत सापडला तेव्हा त्याचे फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरु झाला. थोड्या वेळाने त्याला सोडून दिलं. हळू हळू अंधार पडला. आकाशात पसरलेल्या तांबड्या रंगाच्या छटा नाहीशा होई पर्यंत तिथेच रेंगाळत राहिलो. अंधारबुडुक झाल्यावर रूम वर आलो जेवलो आणि झोपलो.
क्रमशः भाग २ >>
Lai bhari.. waiting for next part.
ReplyDeleteaayla......samya kay bhari lihile ahes, mala vatale mi pan tikade bhet deun aale [;)] kshanbhar paise vachlyacha anand zala .....[:D], pudachi tikane pahaychi ahet pat pat lihi ki ........
ReplyDeletemastach!! ata pudhchya parvachi gatha aaikava...
ReplyDeletemast re!!
ReplyDeleteregards,
sarang
Dhanyawad^infinity... :)
ReplyDelete