पहिला विमान प्रवास

          एके दिवशी बॉस ने बोलावलं आणि सांगितलं दोन दिवसांनी तुला भूजला जायचय आणि ते सुधा विमानाने. आधी भूजला जायचय हे ऐकल्यावर मन राव एकदम हिरमुसले पण नंतर विमान हा शब्द कानी पडला तेव्हा, अचानक दिलेला हा सुखद धक्का आमच्या मन रावांना फार आवडला. आयुष्यात पहिल्यांदाच इमानाने प्रवास करायचा योग आला. बॉस ने आदल्या दिवशी बोलावून, माझ्या हातात जेट ऐरवेजच तिकीट ठेवून एक सल्ला दिला, बाळा पहिल्यांदा प्रवास करत आहेस, लवकर विमानतळावर जा आणि चेक-इन कर म्हणजे तुला खिडकीतली जागा मिळवता येईल. आमच्या हि बाळबोध मानाने तो सल्ला ऐकून अगदी तसंच करायचं अस निश्चित केलं. आता विमान प्रवास करायचा म्हणजे त्यासाठी काय काय जय्यत तयारी करावी लागते हे पुलंनी आधीच सांगून ठेवलं आहे पण त्यांचं ऐकण्याच्या फंदात न पडता सरळ एक बॅग भरली, नेहमी लागणाऱ्या वस्तूंची, पहाटे ४.०० चा गजर लावला आणि झोपी गेलो.
         विमानतळावर लवकर पोहोचायचं ठरवल्याने पहाटे पहाटे ६.०० वाजता सगळं आवरून निघालो. आता आमच्यासाठी सकाळी ६.०० म्हणजे पहाटच. त्याआधीच आदल्यादिवशी रात्री वोल्वो च तिकीट बुक करून ठेवल होत. वोल्वो ने सुधा पहिल्यांदाच प्रवास करणार होतो. किती गोष्टी पहिल्यांदा होतात माणसाच्या आयुष्यात. असो... तर पुणे-मुंबई प्रवास एकदम आरामात झाला आणि मला त्या रोडवरच्या उडण खटोल्याने ९.३० ला मुंबई विमानतळाजवळ  सोडलं. बस मधून खाली उतरल्या उतरल्या एक इसम (अर्थातच रिक्षावाला ) धावत धावत माझ्या जवळ आला आणि...

इसम: (मुंबैया हिंदी) "किधर को जानेका? ".
मी: विमानतळावर जायचय (मराठी माणूस जागा झाला होता, मी मुंबई मध्ये नवीन आहे हे त्याने ताडलं होतं).
इसम: ४० रुपये होतील.. (त्याच्यातला मराठी माणूस जागा झाला)
मी: नाही हे खूप जास्त होतात, इथेच तर आहे विमानतळ (माहित नसून सुधा बोललो... उगाच माहिती असण्याचा आव)
इसम: ठीके २० रुपये द्या... त्या पेक्षा कमी नाय घेणार.....
मी: चालेल (एकदम हसत, आपण २० रुपये वाचवले या आनंदाने हो म्हणालो...)

       पण लगेचच आपण कसं फसलो आहोत याचा अनुभव आला. त्या गड्याने मी रिक्षा मध्ये बसल्यावर रोड क्रॉस करून शेजारच्या गल्लीतून रिक्षा आत घातली आणि बगतो तरं काय समोरच विमानतळ. साधारण ३०० मीटर आत जाऊन त्याने गाडी थांबवली आणि २० रुपये मागितले. जे अंतर चालून जाता येण्यासारखे होते तिथे मी रिक्षा केली होती.  नाईलाजाने मी ते दिले आणि कुठे माझे पैसे गेले, कंपनीचेच तरं गेले, असा स्वतःच्या मनाचा समाधान करून घेतलं. तरं असा मी शेवटी एकदा विमानतळात पोहोचलो.
            विमानाची नियोजित वेळ होती १२.३५ पी.एम. , आणि मी तब्बल तीन तास आधी पोहोचलो होतो, ज्याचा मला नंतर पाछाताप झाला. आत गेल्यावर, मी चेक-इन करावं म्हणून मी कौन्टर शोधलं आणि तिथे गेल्यावर समजलं कि इतक्या लवकर चेक-इन करता येणार नाही, आणखी अर्धा पाऊण तास थांबावं लागणार होतं. मग काय वेळ घालवण्यासाठी मग विमानतळावर हिंडत बसलो. आता विमानतळ असल्यामुळे प्रेक्षणीय स्थळ भरपूर होती, त्यामुळे अर्धा तास लगेचच गेला आणि मी चेक-इन केलं. चेक इन करतानाच कौन्टर वरच्या रमणीने खिडकीची जागा पाहिजे का विचारलं आणि मी तत्काळ हो म्हणालो (बॉसच का ऐकावं याचा साक्षात्कार झाला) . त्याच वेळी तिच्या कडे मी माझ समान पण दिलं. पुढे सेक्युरिटी चेक झाल्यावर सुधा, अजून एक तास वेळ काढायचा होता आणि मोबेईलचं नेटवर्क गायब झालं होतं. जेव्हा वेळ घालवायचा असतो तेव्हा नेमकं मोबेईलचं नेटवर्क का जातं याचा उलगडा मला अजूनही झालेला नाही. मग एक छानशी जागा शोधून खुर्चीत जाऊन बसलो. जागा अशी शोधली, जिथून मला जास्तीत जास्त लोकं नीट दिसतील (आता या मागचा हेतू सांगायलाच नको) आणि शिवाय काचे बाहेर बघीतलं तर विमानाचं दर्शन होईल. जागा चांगली मिळून सुधा एक तास एकट्याने घालवणे म्हणजे खूपच कंटाळवाणा उद्योग. त्यातल्या त्यात एका फिरंगी कुटुंबाचे चाळे बघण्यात थोडा वेळ मन रमलं. अखेर तो एक तास मी कसाबसा काढला आणि मनात ठरवलं पुढच्या वेळेस इतक्या लवकर विमानतळावर यायचं नाही (तसंच पुढे आचरणात सुधा आणलं).
         साधारण १२.०० ला विमानाची अनौन्सेमेंट झाली आणि मी विमानाकडे जायला निघालो. आम्हाला न्यायला एक बस आली ज्या मध्ये बसून विमानाजवळ गेलो. आयुष्यात पहिल्यांदा, मानवाने निर्माण केलेल्या यांत्रिक पक्ष्याचं एवढ्या जवळून दर्शन घेत होतो. माझं विमान बोईंग जातीच होतं. इतका वेळ जे विमान जेट ऐरवेजच होतं ते आता माझं झालं होतं. ते एवढं मोठं धूड बघून खरच खूप आनंद झाला. एक शिड्या असणारी बस विमानाला चिकटून उभी होती ज्या वापरून विमानात प्रवेश करायचा होता. वर जाण्या अगोदर दोन तीन लोकं आमचं तिकीट चेक करून वर जायला सांगत होती. त्यांमध्ये एक झक्कास दिसणारी मुलगी पण होती. हवाई सुंदरी काय प्रकार असतो ते तिला पहिल्या नंतर कळलं. ती हसत मुखाने (आता ते किती खरं आणि किती खोटं हे देवालाच माहिती) सगळ्यांना वर जायला सांगत होती आणि तुमची यात्रा आनंदी होवो असं सांगत होती. वर गेल्यावर सुधा एक सुंदरी ढीगभर मेकप फासून होतीच दारात उभी. असो... मी आत गेलो आणि माझी जागा शोधून विराजमान झालो. ५-१० मिनिटातच विमानाचं दार बंद झालं. कॅबीन क्रू मधील एकीने, आपत्कालीन स्थितीत काय करावं याच प्रात्यक्षिक दिलं. कोकपिट मधल्या क्याप्टनने, त्याच्या जाग्यावर बसूनच आमचं स्वागत केलं आणि विमान कधी पोहोचेल वगैरे वगैरे माहिती दिली.  सगळेजण आपापल्या जागी सेट्ल झाल्यावर एका सुंदरीने आम्हाला पाण्याची बाटली आणि काही चॉक्लेट्स दिले.
          माझ्या प्रवासाचा वेळ होता ५५ मिनिटे. विमान सुरु झालं आणि मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. हळू हळू विमान धावपट्टी वर आलं आणि स्थिर झालं. परत संथ गतीने जाऊ लागलं आणि वेळ येताच अचानक विमानाचा वेग वाढला आणि बघता बघता आम्हाला सगळ्यांना घेऊन तो पक्षी हवेत झेपावला. जेव्हा विमान धावपट्टी वरून वर झेपावत होतं तेव्हा मी खिडकीतून बाहेर जमिनी कडे बघत होतो, ती हळू हळू खाली चालली होती. अरेरे !!! चुकलं चुकलं, विमान हळू हळू वर चाललं होतं. खाली दिसणार दृश्य फारच मस्त होतं. सूर्य नारायण चांगलेच तळपत होते,  त्यात मुंबईचा निळाशार समुद्र सुरेख दिसत होता. बराचसा प्रवास समुद्रावरूनच होणार होता. मधेच एखादं जहाज होडी सारखं दिसत होतं. बाजूला पाहिलं तर ढग दिसत होते आणि मी त्यांना इतक्या जवळून बघत होतो. एक वेळ अशी आली कि खाली पांढरा शुभ्र गालीचा अंथरून ठेवल्याचा भास झाला. दुपारची वेळ होती म्हणून आम्हाला जेवण दिलं जाणार होतं. खाणे पिणे चालू असताना सुधा बाहेरच जास्त लक्ष होतं. आपल्या शेजारी कोण बसलेलं आहे हे सुधा मला आठवत नाही, पण मुलगी न्हवती हे निश्चित नाही तर नक्कीच आठवली असती. अरबी समुद्र संपल्यावर थोडा वेळ भूप्रदेश लागला, ज्यात थोडे फार डोंगर दिसले आणि बरीच शेती दिसली. कशाची होती ते काही कळलं नाही पण हिरवेगार पट्टे मोहक वाटले. मधेच कुठेतरी तुरळक वस्ती दिसायची. हे सगळं बाहेर बघत असतानाच आंत विमानात हवाई सुंदर्यांची ये-जा चालूच होती. त्यामुळे विमानाच्या आत आणि बाहेर असं दोनीही अंगाने मी निसर्ग सौंदर्य बघत होतो आणि डोळ्यात जमेल तितकं सगळं साठवून ठेवत होतो. अजूनही आठवलं तर ती सगळी दृश्य डोळ्यासमोर उभी राहतात.
          असंच सगळं नयनरम्य चालू असताना क्याप्टन साहेबांनी भूजला पोहोचल्याच सांगितलं.        एक दोन घिरट्या घेऊन विमानाने भूज विमानतळावर उतरण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी आम्हाला परत एका हवाई ललने ने काही उपदेश केले.  पाहिला हवाई प्रवास संपला होता. विमानातून उतरल्यावर परत एकदा बसने आम्हाला विमानतळावर पोहोचवलं होतं. विमानतळात आल्यावर मला काळजी लागली होती ती माझ्या बॅगची, जी मी चेक-इनच्या वेळी त्या रमणी कडे सुपूर्त केली होती. जिथे सगळी जण आपलं समान घेण्यास जमा झाली तिथेच मी पण उभा राहिलो. एक पट्ट्यावर बर्याच बॅगा हळू हळू सरकत होत्या त्यात मी माझी बॅग टिपली. ती दिसल्या मुळे माझा जीव भांड्यात पडला. जवळ आल्यावर मी तिला (बॅगला) उचलली आणि आनंदाने विमानतळाच्या बाहेर पडलो. पाहिला विमान प्रवास सगळ्या घटनांसकट लक्षात राहिला तो कायमचा...

5 comments:

  1. sameer gr8, asech kahise kiti diwas lihi ase sangat hote mi ,mast jamle ahe ekdam, bole to zakas , ajun navin kadhi vachayla milanar mahiti nahi evdhe mahine vi4run he vachale.pudche lavkar milo vachayla hi apeksha

    ReplyDelete
  2. good one

    keep blogging mate

    ReplyDelete