'लेह' वारी, भाग २

          
    << भाग १

             कृष्णाला ७.०० ला कामाला जायचं असल्याने सकाळी लवकर उठलो. लगेच आवरलं आणि कृष्णा बरोबरच बाहेर पडलो. कृष्णा हायवे पर्यंत सोडायला आला होता. आज मनालीला पोहोचायचं ठरलं होतं. अंतर ३०० km, म्हणजे रोजच्या पेक्षा कमीच, त्यामुळे आजचा मुक्काम ठरलेल्या ठिकाणीच होणार हे निश्चित वाटत होतं. नाष्टापाणी न करता, तसेच चंडीगड सोडला आणि एक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सुरु झाला. दिसाड पावसात चिंब भिजणे काय असते? ते आम्हाला विचारा. धो धो पावसात शिमला रोडने पुढे गेल्यावर पिंजनौर मध्ये शिमल्याकडे जाणारा रस्ता सोडून डावीकडे बद्दी मार्गे स्वारघाट कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. जस जसं बद्दी जवळ यायला लागलं तस तसं पावसाचा जोर कमी झाला. मधेच एके ठिकाणी आम्हाला TVS मोटर्सचा कारखाना दिसला. दोन अडीच तास गाडी चालवल्यावर एका ढाब्यावर थांबलो. भरपेट जेवण केलं आणि निघालो. आता कुठे खरा प्रवास सुरु झाला होता. स्वारघाटच्या डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. स्वारघाटकडे जाताना जो घाटरस्ता सुरु झाला तो झालाच. एका नंतर एक डोंगर चढत होतो, उतरत होतो. वासुंधरेने हिरवा शालू नेसला होता. वर निरभ्र आकाश आणि आजूबाजूला हिरवळ पाहून मनाला प्रसन्न वाटत होतं.
घाटरस्ता धरल्यापासून, रस्त्याच्या बाजूने नदी दिसायला सुरुवात झाली, कधी ती उजव्या बाजूला असायची तर कधी डाव्या बाजूला, कधी ती आमच्या बरोबर वाहायची तर कधी आमच्या विरुद्ध. कधी ती संथ वाहत होती, कधी खळखाळाट करत धावत होती. कशीही  असो आणि काहीही होवो  तिने साथ काही सोडली नाही.  जस जसं स्वारघाट जवळ यायला लागला तस तसं डोंगर आणखी उंच होऊ लागला आणि ढग खाली येऊ लागले. आपल्याकडे पावसाळ्यामधे, सह्याद्रीत हे दृश्य सगळीकडेच पाहायला मिळतं पण आम्हाला ते उत्तरेत पाहायला मिळत होतं. ढगातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. हवेतला गारवा हवा हवासा वाटत होता. बघता बघता स्वारघाटला पोहोचलो. थोडा वेळ थांबलो. डोळे भरून आजू बाजूचा निसर्ग पाहून घेतला आणि पुढे निघालो. घाट रस्ता असल्यामुळे, दुहेरी वाहतूक सुरु झाली होती. एकतर दुहेरी वाहतूक, त्यात जास्तीजास्त ट्रकवाले, आणखी कहर म्हणजे खड्डेमय रस्ता. त्यामुळे गाडी चालवण्याचा वेग बराच कमी झाला होता. तरी उतारावर थोडा वाढायचाच. जमेल तिकडे खड्डे चुकवत, जमेल तिथे जमेल त्या वाहनांना मागे टाकत पुढे सरकत होतो. असेच जात असताना एका उतारावर घोळ झाला आणि मी पडलो. पुढे बऱ्यापैकी अंतरावर एक ट्रक चालला होता आणि मी त्याच्या पाठोपाठ. अचानक एक खड्डा चुकवता न आल्यामुळे त्यातून हळू जावं म्हणून मी जोरात ब्रेक दाबला आणि तिथेच चूक केली. तो इतक्या जोरात दाबला गेला कि गाडी स्लीप झाली आणि मी पडलो. मागून तुषार येत होता, त्याचही मित्रप्रेम अगदी त्याच वेळेला उफाळून आलं आणि तोही लगेच गळा भेटीला आला. मी पडलो होतोच, तोही पडला. फरक इतकाच कि त्याची गाडी पडली पण तो अडवा नाही झाला. नशीब तेव्हा मागे कोणतीहि गाडी नव्हती. नाही तर काही खरं नव्हतं. असो... तुषारने उठून त्याची गाडी बाजूला घेतली. मी हि तो पर्यंत गाडीचं इंजिन बंद करून गाडी उचलण्याचा प्रयत्न करत होतो. तळ हाताला खर्चटलं होतं बाकी काही विशेष लागलं नव्हतं. गाडीला लेगगार्ड असल्याचा फायदा झाला (पाय वाचले होते). तो परत येई पर्यंत जाणारी येणारी वाहन काही झालच नाही, अशा तोर्यात निघून जात होती. तुषार आणि मी दोघांनी मिळून माझी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. तोंड-हात धुतले, पाणी प्यायलो, दोनीही गाड्यांना काही झालं का? ते पाहिलं आणि तिथेच १०-१५ मिनिटे थांबलो. सगळकाही नॉर्मल झाल्यावर तिथून निघालो आणि पुढे एके ठिकाणी चहासाठी पुन्हा थांबलो. चहा घेतला, थोडा आराम केला आणि पुढे निघालो. आता गाडी जास्तच लक्षपूर्वक चालवत होतो.  बराच वेळ वळणा वळणाच्या रस्त्यावर गाडी हाकून झाल्यावर एके ठिकाणी छोटं धारण ओलांडून पुढे गेलो. थोडंसं वर चढल्यावर एके ठिकाणी चहासाठी थांबलो. (सारखं सारखं थांबून चहा काय घ्यायचा? अस ज्यांना वाटत असेल त्यांना त्या अमृताचं महत्वाच कळलेलं नाही असे मी म्हणेन.) या बाजूने धरणाचा नजारा छान दिसत होता. पुन्हा १० - १५ मिनिटे आराम केला आणि निघालो. संध्याकाळचे ४ वाजले असतील. सकाळ पासून अनुभवलेला रस्ता बघून मनालीला पोहोचायला रात्र होणार हे निश्चित होतं. पण मानाने निर्धार केला होता, काहीही झालं तरी मनाली मुक्काम चुकवायचा नाही. कारण तो चुकला तर आधीच चुकलेली गणितं आणखीनच चुकणार होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नदी बरोबर आमचा प्रवास सुरूच होता. जाता जाता एके ठिकाणी भोगदा आला. लांबीने साधारण २-२.५ km पण रुंदी ने तसा लहानच होता. पुढे चाललेल्या मोठ्या गाडीला ओवरटेक करायला सुद्धा जागा नव्हती. भोगदा पार झाला आणि जगच बदलल्या सारखं वाटू लागलं.
 मनाली लांब असून सुद्धा जवळ वाटू लागली. नदीच्या पाण्याचा खळखळाट वाढला. पाण्याचा तो अजब नादब्रह्म बराच वेळ आमच्या बरोबर होता. तो निसर्ग मनात साठवत हळू हळू पुढे जात होतो. थोडं पुढे गेल्यावर आधुन मधून लांब जाऊन जवळ येणारी नदी खूपच जवळ आली. इतकी कि कोणत्याही ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी लावून दोन पाऊलं पुढे टाकली कि नदीत उतरता येईल. बघता बघता कुलू पार केलं. ६.०० वाजून गेले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. ढग दाटून आले होते त्यामुळे जास्तच अंधारून आलं होतं. आता तर मनाली आलंच असं वाटू लागलं होतं. किती तरी वेळ आम्ही मनालीचा बोर्ड दिसण्याची वाट बघत होतो पण एकही बोर्ड दिसेल तर शप्पथ. रस्ता लहान झाला होता आणि ठिकठिकाणी दगड धोंड्यांचा होता. रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी घरं, रेसोर्ट दिसायला सुरुवात झाली होती. आम्हाला वाटलं मनालीत पोहोचलो. मग एके ठिकाणी  हॉटेल मध्ये रूमची चौकशी  केली तेव्हा कळलं मनाली आणखी २० km आहे. आयला!!! आणखी अर्धा तास तरी सुट्टी नाही. जिथे थांबलो होतो तिथेच एक सफरचंदाच झाड दिसलं. इतके दिवस सफरचंद फक्त फळाच्या गाडीवर सजवलेली पहिली होती. पहिल्यांदा ती झाडावर सजलेली पाहून जाम भारी वाटल. लगेच फोटो काढून घेतला आणि पुढे निघालो. पाऊस पुन्हा सुरु झाला. समान भिजू नये म्हणून लवकरात लवकर मनालीत पोहोचून हॉटेल शोधणे गरजेचे होते. पुन्हा गाडी दामटायला सुरुवात केली. वरवर भिजलो पण अखेर मनालीत पोहोचलो. एक दोन हॉटेल बघून राहण्याची जागा निश्चित केली. सगळं व्यवस्थित आवरलं, घरी फोन करून सगळा रिपोर्ट देणे आणि रोजचा हिशोब करणे या नित्यनियम बनलेल्या दोन गोष्टी केल्या, जेवलो आणि झोपलो.
              भरपूर आराम मिळाल्यामुळे सकाळी लवकर जाग आली. पाण्याचा आवाज येत होताच.
  आधी वाटलं कि अजूनही पाऊसच चालू आहे पण खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर शेजारून नदी वाहताना दिसली. पाण्याचा खळखळाट ऐकून आणि शेजारी असलेल्या डोंगरावरचा निसर्ग पाहून टवटवीत झालो. पटापट सगळं आवरलं आणि हॉटेल सोडलं. नुसतं वाचून आणि ऐकून माहिती होतं कि इथून पुढचा प्रवास खडतर आणि आव्हानात्मक आहे. आता तो आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचा होता. मनाली पासून लेह पर्यंत, मधे तंडी सोडलं तर, कुठेही पेट्रोल पंप नाही हे माहिती होतं आणि तंडी, मनाली पासून फार काही लांब नाही हेही माहिती होतं म्हणून मग मनाली मधेच दोनीही गाड्यांमध्ये पेट्रोल फुल भरून घेतलं, शिवाय रिस्क नको म्हणून दोन कॅन मधे आणखी ५ -५ लिटर पेट्रोल घेतलं. आणखी एक महत्वचा घटक म्हणजे पैसे. लेह पर्यंत कोणत्याही बँकेची शाखा अथवा ATM नाही. अहो ज्या रस्त्यावर बऱ्याचश्या ठिकाणी गवताची कडी सुद्धा बघायला मिळत नाही, तिथे या गोष्टींची काय गत असेल. असो... दोन महत्वाची कामं झाली आणि आम्ही निघालो. पुढे गेल्यावर लक्षात आलं कि घरी फोन केला पाहिजे, कारण BSNL पोस्टपेड व्यतिरिक्त लेह पर्यंत इतर कोणतही कार्ड चालत नाही. लगेच थांबून घरी फोन लावला. १०-१५ मिनिटे बोलून झालं, त्यात बोलताना हे हि सांगून टाकलं कि आता जर मधे फोन नाही मिळाला तर थेट दोन दिवसांनतर "लेह" मधे पोहोचलो कि फोन करेन. दोनचार निसर्गाचे फोटो काढले आणि निघालो.

छोटे छोटे आणि पांढरे शुभ्र धबधबे दिसायला लागले. आता कुठे निसर्गाच रूप हळूहळू उमलायला लागलं होतं आणि आम्ही हळू हळू समुद्र सपाटी पासून वर आणि मानवी जगा पासून लांब जायला लागलो होतो. जिकडे पाहू तिकडे त्याने...हो त्या निसर्गानेच सुंदर चित्र रेखाटलेलं दिसत होतं. आम्ही ते सगळं डोळ्यात साठवून पुढे पुढे मार्गक्रमण करत होतो. आता प्रवास आरामात करायचा होता, काही घाई नव्हती. वाट्टेल तिथे थांबत होतो, मनमुराद आनंद घेत होतो आणि पुढे जात होतो. रोहतांग पास (उंची 3,979 मीटर, 13,054 फुट) अजून लांब होता. पण त्याच्या अलीकडेच पावसाचा आणखी एक रंग पाहायला मिळाला. रंग म्हणण्या पेक्षा पाऊस आपल्याला आणखी एका प्रकारे कसा गंडवू शकतो ते पाहायला मिळालं. रोहतांग पासच्या १०-१५ km अलीकडे, रात्री धो-धो पाऊस पडून गेला होता. त्यामुळे आधीच नसलेला रस्ता अगदीच खराब झाला होता. जिकडे तिकडे चिखलच चिखल. रस्त्यावर १ - १.२५ फुट चिखल आणि त्यातून बुलेट सकट वाट काढणारे आम्ही दोघे. आम्ही तसे बरेच वर गेलो होतो, इतके कि आजू बाजूला ढग होते. ढगांमुळे हवेत गारवा होता, पण गारवा असून सुद्धा, ते धूड सांभाळून सांभाळून आम्ही दोघेही घामेघूम झालो होतो. एखादा ट्रक अधून मधून आमच्या बाजूने निघून जायचा. असेच मोठी वाहने जाऊन जाऊन जो रस्ता तयार झाला होता त्यातून कसेबसे पुढे (अक्षरश:) रांगत होतो. बुलेट वर बसून जायचं तर सोडाच. खाली उतरून, गाडी चालू करून, गियर मध्ये टाकून तिला आणि स्वतःला पुढे ढकलत होतो. ५ - १० मिनिटाला थांबत होतो. जिथे जमीन (रस्ता नव्हे) थोडी कडक असेल, तिथे गाडीवर बसायचं, नसेल तिथे खाली उतरून ढकलत जायचं. असं सारखच चालू होतं. इतक्यात एक फिरंगी जोडपं, एकाच बुलेटवर वरून येताना दिसलं. आमच्या जवळ आल्यावर ते  थांबले. आम्ही एकमेकांना पहिला प्रश्न विचारला......बाबारे !!! आणखी किती वेळ असाच रस्ता आहे ? मी सांगितलं २-३ km असेल अजून, मग निवांत जा. त्याचं पण तेच उत्तर आलं, "अजून किमान ३-४ km तरी असेल, नंतर एकदम चकाचक रस्ता आहे". आणखी ३-४ km ऐकून काय म्हणावं तेच कळेना? कुठून बुद्धी सुचली आणि इकडे आलो असं वाटायला लागलं. वजन पेलून पेलून खांदे भरून आले होते. एकदा तर असं वाटलं, जाऊदे, मरुदेत...इथेच बसून राहू, जो पर्यंत रस्ता नीट होत नाही. मधे मधे BRO (Border Road Organisation) वाले रस्ता दुरुस्त करताना दिसत होते. पुन्हा पाऊस पडला कि सगळी मेहनत वाया जाणार हे माहिती असून सुद्धा तिथल्या लोकांसाठी, पर्यटकांसाठी ते अथक परिश्रम घेत होते आणि पुढेही घेत राहणार होते. असो... एके ठिकाणी तर मला त्यांनी मोलाचा सल्ला पण दिला. मी आपला गाडीवर बसून जाता यावं म्हणून कडे कडेने (दरीच्या) जात होतो. तिथे जमीन थोडी कडक होती म्हणून, पण अचानक एके ठिकाणी रस्ता खचला असल्यमुळे पुढे जाता येईना. गाडीवरून खाली उतरलो आणि काय करावं हा विचार करत होतो. तुषार अजून मागेच होता. तो तिकडे अडकल्यामुळे त्याने माझ्या मदतीला येणे शक्यच नव्हते. मागे फिरायचा पर्याय पण नव्हता. एकच पर्याय होता, गाडी चिखलात घालणे. पण ते तरी कुठे जमत होतं. आधीच हात पाय दुखत होते, त्यात दरीच्या कडेचा भाग उंच, ज्याच्यावर मी गाडी सकट उभा, एका बाजूला दरी आणि दुसऱ्या  बाजूला गाडीच्या पलीकडे फुटभर चिखल. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गत झाली. तेव्हाच ते BRO वाले देवा सारखे धावून आले. त्यांनी गाडी ढकलायला मदत केली आणि मी चिखलात उतरलो. जाता जाता एक जण सांगून गेला. "काहीहि झालं तरी दरीच्या कडेने जाऊन नका, फुकट पडून मराल. त्या पेक्षा मधून जा, चिखलातून, काही होणार नाही". हे ऐकल्यावर पुन्हा काय मी गाडी कडेला न्यायची डेरिंग केली नाय. असाच एके ठिकाणी आराम करायला थांबलो होतो, तेव्हा आणखी एक जण वरून खाली ट्रेक करत उतरत होता. तो आमच्या जवळ आला आणि
इसम: मी मेकॅनिक आहे. आत्ताच एकाची क्लच प्लेट बदलून येतोय. तुम्हाला काही मदत हवी आहे का ?
मी: नको रे बाबा, अजून तरी गाडी धडधाकट आहे. काही प्रोब्लेम नाही.
इसम: तुम्हाला या चिखलातून गाडी काढून देऊ का ?
मी (मनात): तुला पैसे देऊन गाडी इथून बाहेर काढायची असती तर इथे कशाला मारायला आलो असतो. जा निवांत तू खाली.
मी: नको आम्ही जाऊ जमेल तसं.
इसम: हे घ्या माझं कार्ड!. काही लागलं तर फोन करा.
मी (मनात): तुला फोन लावायला नेटवर्क तर हवं ना !!!
मी: बरं!!!

तो कार्ड देऊन झपझप खालच्या प्रवासाला लागला आणि आम्ही वरच्या प्रवासाला. कधी गाडीवर, कधी चालत असं जवळ पास ७-८ km हा खेळ चालू होता. तो पट्टा ओलांडून जायला आम्हाला २.५ ते ३ तास लागले.


 

            पुढे मग रस्ता चांगला लागला आणि आम्ही एके ठिकाणी थांबलो. जेव्हा त्या भंगार रस्त्यावर होतो, तेव्हा चीखलात लपलेल्या दगडांचा अंदाज न आल्याने गाडीच्या इंजिनला आणि सायलेन्सरला बऱ्याच वेळा मार लागला होता. पण दर वेळेस थांबून ते बघणं जीवावर यायचं म्हणून मग असं  निवांत थांबल्यावर सगळं पुन्हा चेक केलं. फार काही विशेष झालं नाहीये समजल्यावर जीव भांड्यात पडला. फक्त एका कॅन मधून पेट्रोल हळू हळू गळतय हे लक्षात आलं. नक्की कुठून ते काही कळलं नाही. दोनीही गाड्यांमध्ये भरपूर पेट्रोल आणि दुसरा कॅन होता, तो अर्धा भरलेला, त्यामुळे त्यात पेट्रोल टाकून हेन्काळून सांडणार म्हणून मग पहिला कॅन रिकामा पण करता येईना. थोडं पेट्रोल चांगल्या कॅन मधे टाकलं आणि बाकी तसच घेऊन जायचं ठरलं. म्हंटल गाडीत टाकू अजून थोडं पुढे गेल्यावर. मग थोडा वेळ गप्पा मारत बसलो. बोलताना तुषारने सांगितल कि येताना तो एका मोठ्या दगडावर गाडी सकट चढला होता, पण नशीब चांगलं म्हणून फार काही न होता गाडी खाली घेऊन सुखरूप आला. हे नंतर ऐकायला छान वाटलं पण त्याने जे काही त्या वेळेला अनुभवलं ते त्याचं त्यालाच माहिती. सकाळी निघाल्या पासून काही खाल्लं नव्हतं आणि एवढी मेहनत केल्यावर भूक पण खूप लागली होती. मग अशा अडनानिड वेळी उपयोगी पडेल म्हणून तुषारने आणलेल्या सुक्यामेव्यावर ताव मारला. अर्धा तास घालवला आणि पुढे निघालो. पुढचा रस्ता लई म्हणजे लईच भारी होता. आता वर्णन करण्यापेक्षा फोटोच बघा.
सगळं डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही पुढे जात होतो. दोघेही थोड्या फार अंतराने मागे पुढे रहात होतो. पेट्रोल कॅनच हेन्काळणं थांबलं होतं, पण पेट्रोल तरीही बाहेर येतच होतं. एकतर पेट्रोल मिळण्याचे वांदे आणि हे भरभर उडून गेलं तर जायचं कसं ? शेवटी एके ठिकाणी थांबलो आणि तो गळका कॅन दोनीही गाड्यांमध्ये रिकामा केला तेव्हा कुठे बरं वाटलं. प्रवास मस्त चालू होता. कधी एखादि जागा आवडली म्हणून तो थांबायचा, कधी मी थांबायचो आणि कधी आम्ही दोघेही थांबायचो. सकाळी झाली तेवढी गडबड, धडधड पुरे नव्हती कि काय, कि आणखी एक घोळ माझ्यासाठी झाला. एकदा मी फोटो काढायसाठी थांबलो आणि हा गेला पुढे निघून. फोटो काढून झाल्यावर मीहि मागोमाग आलो आणि एके ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटले तिथे थांबलो. आमचे महाशय कसलीही खुण मागे न सोडता कोणत्या रस्त्याने गेले याचा काहीच पत्ता लागत नव्हता. आजू-बाजूला दऱ्या डोंगरांशिवाय काहीच नाही. बरं सावलीला तिथे एक झाड सुद्धा नाही. न कोई आगे , न  कोई पिछे, १०-१५ मिनिटे एकटाच त्या जागी थांबलो होतो. कुठून जावं हा विचार करत बसलो. तेव्हा मागून एक गाडी आली. त्यांना हात करून थांबवलं.
मी: केलोंगचा को कहाँ से जानेका ?.
ड्रायवर: कौनसा भी रस्ता ले लो. दोनो उधरही जाता है !
मी (मनात): झाली का पंचाईत? आमचे साहेब कुठून गेलेत कुणास ठाऊक ?
मी: कौनसा रस्ता से ज्यादा गाडी जाती है ?
ड्रायवर एका फाट्या कडे बोट दाखवून, दुसऱ्या फाट्याने निघून गेला. आयला मला एक रस्ता सांगतोय आणि स्वतः दुसऱ्या रस्त्याने जातोय. पुन्हा तिथे १० मिनिट थांबलो. मागून एक ट्रक आला आणि ड्रायवर ने दाखवलेल्या रस्त्याला वळला.
मग काय आधीच्या आणि ह्या दोनीही ड्रायवर विश्वास ठेवून ट्रक गेला त्या दिशेने पुढे जायला सुरुवात केली. म्हंटल बघू हा शहाणा (तुषार) भेटला तर ठीक नाही तर संध्याकाळी सापडेलच, जातोय कुठे या वाळवंटात? धुळीने माखलं जाऊ नये म्हणून पटकन ट्रकला ओवरटेक केलं आणि पुढे गेलो. रस्त्यात तो(तुषार) दिसतोय का बघत होतो आणि फाट्यावर थांबला नाही म्हणून शिव्या घालत होतो. बराच पुढे गेल्यावर बंधू एके ठिकाणी फोटो काढताना दिसले तेव्हा कुठे जीवात जीव आला. त्याच्या जवळ गेलो, थांबलो, चार शिव्या घातल्या आणि सोबत चार फोटो काढले. पुन्हा अस काही करायचं नाही हे बजावलं आणि पुढे निघालो. एकदा थांबून पुन्हा पेट्रोल भरण्याचा कार्यक्रम झाला. दुसरा कॅन पण रिकामा केला आणि पेट्रोल उडून जाण्याची काळजी मिटली. सकाळी निघाल्यापासून सुक्यामेव्या शिवाय काही खाल्लं नव्हतं, हॉटेलचा तर पत्ताच नव्हता. साधारण दोन वाजता एक गाव दिसलं. गाव कसलं १५-२० कुटुंब रहात असतील एवढेच लोक. पण महत्वाचं कारण तिथे हॉटेल, ढाबा काहीही म्हणा ते होतं. मेनू ठरलेलाच. मिक्स डाळीची उसळ, पोळी, भात आणि वरण. पोटभर जेवलो आणि जेवण झालं कि चहा प्यायला. ते गाव दरीत होतं, त्यामुळे उन असून सुद्धा हवेत गारवा होता आणि गार वातावरणात गरम गरम चहा पिण्यात काय मजा असते ते सांगायलाच नको. थोडा आराम केला आणि पुढे निघालो.
पुन्हा तेच चालू. हवे तिथे थांबणे आणि निसर्गाचा आनंद लुटणे. असेच पुढे जाताना एके ठिकाणी आम्हाला रस्त्यावर ओढा लागला. रस्त्यावरून थंडगार पाणी वहात होतं. वाचून आणि फोटो पाहून माहिती होतं कि लेहला जाताना खूप ओढे ओलांडावे लागतात आणि  हा आमच्यासाठी पहिला होता. पुढेहि खूप ओलांडले, त्यातल्या त्यात हा बऱ्या पैकी चांगल्या रस्त्यावर होता. थोडक्यात ओढा चांगल्या रस्त्यावरून वाहत होता तरीही तुषारने खाली उतरून ओढा ओलांडण्यात काही अडचण आहे का आणि कुठून कसं जायचं ते पाहिलं. मग तो आधी गेला आणि त्याने क्रोस केल्यावर मी हि त्याच वाटने चाकावर चक (पायावर पाय सारखं) ठेवून गेलो.  पुढे तंडी आलं. तंडी म्हणजे शेवटचा पेट्रोल पंप. म्हंटल बसेल तेवढं पेट्रोल भरू आणि जाऊ पुढे. सोपस्कार म्हणून जेमतेम पेट्रोल भरलं  आणि पुढे दवडू लागलो. बघता बघता केलोंग मागे पडलं.


पुढे जीस्पाला थांबायच ठरवलं होतं. जीस्पा जवळ पोहोचायला आम्हाला सहा वाजले. केलोंग पासून पुढे जीस्पा पर्यंत रस्ता एकदम चकाचक होता. दिवस मावळला नव्हता पण पुन्हा एकदा अंधारून आलं. दुसरं काय असणार, पावसाचं लक्षण. देवाचा धावा सुरु केला. दिवसाच्या शेवटी भिजायची अजिबात इच्छा नव्हती. जीस्पात पोहोचलो तेव्हा थेंब पडायला सुरुवात झाली. जर्किन, हेल्मेट, बूट होते त्यामुळे बाकी कुठे काही जाणवत नव्हतं पण हातात हातमोजे (काहींसाठी ग्लोव्ज) घातले नव्हते. बोटं सुन्न करून टाकली त्यांनी, एवढे थंड होते ते थेंब. पावसा पासून वाचावं, पटकन निवारा मिळावा म्हणून एका हॉटेल मध्ये घुसलो. पोराने गरजू व्यक्तींना ताडले होते आणि एक रूमचा १२०० भाव सांगून अडून राहिला. घासाघीस केली पण पठ्या मानायला तयार नव्हता. मग काय त्याला भिक न घालता तिथून निघालो आणि पुढे गेलो. थंड थेंब थेंब पाऊस सुरु होताच पण आम्हाला भिजवेल एवढा नव्हता. पुढे HPTDC (आपल्या MTDC सारखं) दिसलं. ५०० रुपये भाडं. काहीही आढेवेढे न घेता रूम बुक केली आणि पटकन सामान सोडून आत घेऊन गेलो. जाता जाता तिथल्या माणसाकडे जेवणाची चौकशी करून ठेवली. दुर्गम भाग असल्यामुळे हॉटेल जास्त वेळ चालू ठेवत नाही असं कळल. सगळं काही पटापट आवरायला घेतलं. तिथल्या रखवालदाराबरोबर (काका) त्याची नातहि कुतुहूल म्हणून रूम पर्यंत आली. आमची सगळी सोय बघे पर्यंत ती आमच्या इथेच थांबली. त्या चिमुकली बरोबर थोड्या गप्पा झाल्या. ते काका सगळं ठीक आहे ते पाहून परत आले आणि जायला निघाले. जाताना त्यांच्या हातात काही पैसे दिले आणि सांगितलं तुमच्या नातीसाठी काही तरी छान घ्या. पुढे आवरत असताना पाऊस भूर भूर सुरु झाला आणि आवरून झालं तरी तो पडतच होता. तो उघडण्याची वाट पाहत बसलो. चांगला तासभर बरसून झाल्यावर त्याने विश्रांती घेतली. मग आम्ही बाहेर पडलो, हॉटेलवाल्याने आमच्यासाठी हॉटेल चालू ठेवलं होतं. मॅगी आणि ब्रेड ओम्लेट शिवाय काही पर्याय नव्हता. मॅगीची ओर्डर दिली आणि बसलो गप्पा मारत. स्वतःच्या फोन वरून घरी फोन लावण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न झाल्यावर हॉटेल वाल्याचा फोन वापरला, सुखरूप असल्याची आणि इतर माहिती दिली. तिकडे फक्त आणि फक्त BSNL पोस्टपेड चालतं हे लक्षात ठेवावे. असो.... गरम गरम, चटपटीत मॅगी खाऊन थोडा वेळ बसल्यावर हॉटेलवाल्याचा निरोप घेतला आणि आम्ही दोघे रूमवर आलो. सगळा हिशोब केला आणि नव्या दिवसाची नवी सफर करण्यासाठी झोपी गेलो.


क्रमश:   


2 comments: