<< भाग ४
सकाळी लवकर उठलो आणि आवरलं. 'लेह'ला राम राम म्हणायची वेळ आली होती, शिवाय घराचीहि ओढ लागली होती. या वेळी
अर्धवट राहिलेल्या गोष्टी पुढच्या वेळी पूर्ण करण्याचे मनोमन ठरवून
साधारण ८.०० ला आम्ही 'लेह' सोडलं. घरून निघाल्यापासून इथ पर्यंत प्रत्येक
वेळेस ठरलेल्या आराखड्याचे १२ वाजले होते. त्यामुळे 'लेह'ला मुक्कामी
असताना परतीचा प्रवास एकदम आरामात जमेल तसा करायचा ठरवलं. त्यात चंडीगड
पासून पुढे घरी जाण्यासाठी किमान ४-५ दिवस तर घ्यायचेच. उगा पळापळी नाही
करायची असही ठरलं. तुषारच्या वडिलांनी तर गेल्या मार्गेच परत या म्हणजे
तुमचं ३०० km अंतर वाचेल असही सुचवलं. श्रीनगर-जम्मू मार्गे गेलं काय आणि
मानली मार्गे गेलं काय, चंडीगडला पोहोचायला ४ दिवस लागणारच होते. फक्त
मानली मार्गे गेलो तर ३०० km वाचणार होते. पण आल्या मार्गी परत मानलीला
जाणे म्हणजे वेडेपणा होता. नवीन ठिकाणी, नवीन लोकांचा, नव्या जगाचा अनुभव
घेणे आमच्या रक्तातच आहे. तुषारनेही फार आढेवेढे न घेता श्रीनगर-जम्मू
मार्गे जायचं मान्य केलं आणि त्या प्रमाणे आम्ही श्रीनगरच्या दिशेने दौडू
लागलो. रम्य सकाळी कोवळ्या उन्हात आम्ही निघालो होतो. वातावरण अगदी मस्त
होतं. आवडेल त्या ठिकाणी थांबत मजेत प्रवास चालू झाला. माझा कॅमेरा
आधीच धारातीर्थी पडल्यामुळे मी मोबाईलवर फोटो काढत होतो तर तुषार नेहमी
प्रमाणे कॅमेरा घेऊन स्वार झाला होता. सकाळी निघताना वाटेत काय काय
बघण्यासारखं आहे, हे हॉटेलच्या संस्थापकाला विचारायला मी विसरलो नाही.
त्यामुळे पहिला ऑफीशियल थांबा होता मॅग्नेटीक हिल. खूप ऐकून होतो याच्या
बद्दल. गाडी आपोआप खेचून घेतो हा डोंगर अशी बातमी कळली होती. त्यामुळे कुतुहूल इतकं होतं कि, गाडीवर चाललो असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक डोंगराला हाच असेल का तो डोंगर? हाच असेल का तो डोंगर? असं मनाला विचारात होतो. रस्ता चकाचक होता त्यामुळे गाडीचा वेग चांगला ठेवला होता आणि असेच जात असताना रस्त्यावर मोठा चौकोन आखलेला दिसला. स्त्याच्या दोनीही बाजूला मॅग्नेटीक हिलची पाटी होती. आम्ही तिथे थांबलो. गाडी बंद करून निवांत थांबलो,
म्हंटल बघू कशी खेचली जाते ते. पण कसलं काय ओ... ते धूड ढिम्म सुद्धा हलल
नाही. आहे त्या जागीच, आहे तशी लावली होती, तशीच. तुषार म्हणाला मी डोंगरावर
रस्ता आहे तिथ पर्यंत जाऊन येतो आणि तसा तो गेला पण. पार अगदी वर रस्ता
संपे पर्यंत गेला आणि मागे वळून परत आला. त्यालाही काही जाणवलं नाही. मला तर तिथल्या इतर डोंगरांप्रमाणेच हा हि डोंगर तितकाच भक्कास पण आकर्षक वाटला. असो... आम्ही तिथून पुढे निघालो आणि थांबलो ते एका संगमावर. नद्यांची नावं आठवत नाहीत पण दरी मध्ये दोन नद्यांचा संगम होता तिथे आम्ही थांबलो. छान दृश्य होतं. दोनचार क्लिकक्लिकाट केले आणि तिथून काढता पाय घेतला.
जेव्हा संगम पहिला तेव्हा आम्ही डोंगरावर होतो पण खाली उतरून आलो तेव्हा संगमाने तयार झालेली ती नदी आमच्या साथीला आली होती. खळखाळाट करत वाहणाऱ्या पाण्याबरोबर शर्यत लावून आम्हीहि जोरात निघालो होतो. मजल दर मजल करत एक एक छोटं गाव मागे टाकत आम्ही पुढे जात होतो. बऱ्याच गावातले रस्ते खूपच खराब होते. सगळी कडे रस्त्याचं काम चालू होतं. पण दोन गावांना जोडणारा रस्ता मात्र एकदम मस्त होता. तस का होतं या कोड्याचं उत्तर काही मिळालं नाही. मधे मधे सेनेचे ट्रक येता जाता दिसत होते आणि खारदुंगलाला जशी पुढे जायला जागा दिली तशी आताही देत होते. 'लेह'च्या दिशेने निघालेले आमच्या सारखेच बरेच बुलेट वेडे, आम्हाला अंगठे दाखवून ("थंप्स अप") पुढे जात होते. आम्हीहि तेच करत पुढे चाललो होतो. असेच जात असताना पुढे एके ठिकाणी गाड्यांची रांग लागलेली दिसली. आम्हाला
ओवरटेक करून पुढे गेलेल्या चारचाक्या इमानदारीत एका पाठोपाठ थांबलेल्या
दिसल्या. आम्ही आपलं राजरोस पणे त्यांच्या शेजारून थेट पुढे पर्यंत गेलो.
पाहतो तर काय? दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला होता. BRO वाले रस्ता
दुरुस्त करण्यात मग्न होते आणि आम्ही ते कसं काम करत आहेत हे पाहण्यात दंग
झालो होतो. गाडी स्टँडला लावली आणि पुढे गेलो. मोठ मोठे दगड ते यंत्राने
नदीत ढकलत होते. रस्त्यावर पसरलेला राडारोडा बाजूला सरकवत होते. एकदा खाली
पडलेला दगड पाहावा म्हणून कडेला जाऊन बघितलं तर तो दगड नाहीसा झाला होता.
त्या नदीने त्याला लीलया आपल्यात सामावून घेतलं होतं. तेव्हा त्या नदीला
नुसताच उथळ पाण्याचा खळखाळाट नसून ती खोल पण होती हे जाणवलं. पुन्हा मागे
आलो. एक सैनिक त्यांच्या गाडीतून खाली उतरून ते सगळं पाहत होता. त्याच्या
जवळ जाऊन बोलावंस वाटलं म्हणून पुढे गेलो तर तो नेमका महाराष्ट्राच्या
मातीचा निघाला. कोपरगावचा. गप्पा सुरु झाल्या. (सगळ्याच इथे द्याव्यात कि
नको अशा संभ्रमात आहे म्हणून जास्त तपशील देत नाही.) तो सुट्टी संपली
म्हणून परत आला होता आणि पुढे कारगिलला चालला होता. आमच्या गाड्या बघून आणि
बाकी प्रवासाची माहिती ऐकल्यावर त्याने तर आम्हाला त्यांच्या छावणीत
आमंत्रण पण दिले. (पण आमच्या कडे तेवढा वेळ नव्हता म्हणून ते राहून गेले).
असो... थोड्या वेळाने रस्ता नीट झाला आणि आम्ही त्याला निरोप देऊन तिथून
निघालो.
निघाल्या पासून ३ तास झाले होते आणि काहीही खाल्लं नव्हतं. म्हणून मग एका चांगल्या ढाब्यावर थांबलो आणि यथेच्छ जेवण केलं. थोडा आराम केला आणि निघालो. थोडं अंतर कापल्यावर आम्ही एका दरीत प्रवेश
केला. दुतर्फा उंचच उंच डोंगर आणि मधून जाणारे आम्ही आणि आणखी काही गाड्या.
पुढचा रस्ता कसा असेल असा विचार चालू असतानाच बाजूच्या डोंगरावर थोडं वर
लक्ष गेलं आणि सेनेच्या ट्रक्सची भली मोठी रांग नागमोडी वळणं घेत हळू हळू वर चढताना दिसली.
एक ट्रक जाईल एवढाच रस्ता असलेला तो घाट होता. आम्ही घाट चढायला सुरुवात
केली आणि लवकरच त्यांच्या जवळ पोहोचलो. एके ठिकाणी सगळ्याच गाड्या थांबल्या
होत्या. समोरून पण वाहनं आल्याने, पुढे जाण्यासाठी दोनीही बाजूंचा प्रयत्न चालू होता. घाटात काही ठिकाणी दोन ट्रक एकमेकाच्या बाजूला मावतील एवढी जागा होती. सेनेच्या अनुभवी चालकांनी हे सगळं ओळखून त्यांच्या गाड्या आधीच थांबवल्या होत्या. पण आम्ही फटफटी घेऊन वाट काढत, कधी दरीच्या बजूने, कधी कड्याच्या बाजूने कुठेही न थांबता पुढे निघून गेलो. पुन्हा मजेत प्रवास सुरु झाला. डोळ्यात सगळं साठवून पुढे जात असताना
भुसभुशीत मातीचा एक डोंगर दिसला. निदान तसा भास तर नक्कीच झाला. असं वाटलं
जर या डोंगरावर कोणी उडी मारली तर तो तिथे वर उभा न रहाता थेट डोंगराच्या
पोटात तळच गाठेल. आठवण म्हणून त्या डोंगराला कॅमेरा मध्ये कैद केलं आणि
पुढे निघालो. पुढे लामायुरू मोनास्ट्रि येई पर्यंत कुठेही थांबलो नाही.
निर्जन ठिकाणी वसलेली हि मोनास्ट्रि खूपच जुनी आहे. एक दोन दिवस इथे
राहायला हवं होतं असाही एक विचार मनात येउन गेला. पण तो नुसताच विचार
राहिला. थोडा वेळ लांबूनच तिचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. घाट लागल्या
पासून रस्त्याचा चांगल्या वाईटाचा खेळ चालू झाला होता. कधी चकचकीत डांबरी
तर कधी भरपूर मातीने माखलेला मातीचाच. समोर ट्रक असेल तर काय विचारायलाच
नको. धुळीच्या ढगातून गाडी चालवण्या शिवाय पर्यायच नव्हता. भरपूर धूळ खाऊन
खाऊन आम्ही शेवटी फोटू'ला' टॉपवर (उंची - १३४८० फुट) पोहोचलो. तिथे आधीच
एक नवीन लग्न झालेलं जोडपं एकमेकाचे फोटो काढण्यात दंग होतं. भरपूर वारं
सुटलेलं आणि दुसरं चीटपाखरू हि नव्हतं. ते फक्त दोघेच होते आणि आम्ही तिथे
पोहोचून त्यांच्या एकांताची वाट लावली. आता आम्ही चौघे होतो तिथे. आपसूकच
नवरोबा, त्या दोघांचा एक फोटो काढावा हि विनंती घेऊन गप्पा मारण्यासाठी जवळ
आले. फोटो वगैरे काढून झाल्यावर गप्पात कळलं कि तो हिरो लग्नाच्या बायकोला
आणि तिच्या सवतीला (फटफटीला) घेऊन हिंडण्यासाठी गुजरात वरून आला होता आणि
श्रीनगर वरून प्रवास सुरु करून लेह'ला' चालला होता. मला हेवा वाटला त्याचा.
बायकोला आणि फटफटीला घेऊन यायचं म्हणजे कमालच केली गड्याने. असो... सुखरूप
प्रवासाच्या त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही (ते पण) तिथून निघालो.
फोटू'ला टॉप उतरायला सुरुवात केली आणि आम्ही धुरळ्या मध्ये गुडूप झालो.
थोडेच खाली उतरलो असू कि पुन्हा आमच्या समोर BRO वाले दत्त म्हणून उभे
राहिले होते. घाटात दरड कोसळली होती ती दूर करण्याचं काम चालू होतं.
तिथे थांबून त्यांचा काम बघण्यापलीकडे आम्हाला काही काम नव्हतं. इतक्यात
सेनेचे ट्रक मागून धुरळा उडवत आले आणि जवळ येउन थांबले. पण समोरून एक अतिशहाणा क्वालिसवाला आला. कुणालाही न जुमानता सरळ मुरुमाड रस्त्यात घुसला आणि
त्याची गाडी फसली. गाडी ताणत होता जोरात पण गाडी जाग्यावरच. चाकं
जाग्यावरच फिरत होती. एक तर काम संथ गतीने चालू होतं आणि त्यात या
शहाण्याने व्यत्य आणलं होतं. शेवटी आतली दोघं खाली उतरली आणि गाडी ढकलू
लागली. कशी बशी ती मागे पुढे घेत, गाडी निघाली. ढकल काम करून दमलेले
दोघे गाडीत बसले आणि ते निघून गेले. BRO वाले आले आणि त्यांनी तो मुरूम नीट
करून आम्हाला जायला रस्ता तयार केला. या BRO ने मनाली सोडल्या पासून आता
पर्यंत कितीतरी ठिकाणी आम्हाला मदत केली होती. त्या साठी त्यांना सलाम.
असो... पुढे रस्ता एकदम झक्कास लागला. त्यामुळे आपसूकच गाडीचा वेग वाढला.
दोन तास आम्ही न थांबता गाडी चालवत होतो. घाट नव्हता पण वळणावळणाच्या
रस्त्यावर गाडी चालवून कंटाळा आला होता. आपल्या इथे जशी वड-पिंपळाची झाडं
रत्याच्या कडेने असतात तसं विसाव्यासाठी सावली देणारं एकही झाड आम्हाला
रस्त्यात सापडेना. म्हणून मग एके ठिकाणी मोठ्ठा बोर्ड दिसला त्याच्या
सावलीत थांबलो. गाडी बाजूला लावली आणि निवांत खाली मांडी घालून दोघेही
जमिनीवर बसलो. गप्पा मारत अर्धा तास काढला. आज कमीत कमी कारगिलला तरी
पोहोचायचं ठरवलं होतं.
थोडा क्षीण कमी झाल्यावर आम्ही निघालो. रमत गमत
आरामात जायला सुरुवात केली. फोटूला टॉपला चढायला सुरुवात केली तेव्हा
नदीने आमची साथ सोडली होती, ती पुन्हा आमच्या साथीला आली. तीच नदी होती कि
दुसरी ते नाही माहिती. पण बरोबर पाण्याचा प्रवाह असला कि छान वाटतं गाडी
चालवायला. मधेच एके ठिकाणी काही ट्रक वाले नदी जवळ ट्रक धुताना दिसले. ते
पाहून आमच्या साहेबांना पण गाडी धुण्याची हुक्की आली. संध्याकाळचे ४ वाजले
असतील आणि कारगिल गाठायचं होतं म्हणून मी न थांबण्यासाठी भांडत होतो आणि हा
बाबाजी उशीर झाला तरी चालेल पण गाडी धुवायची म्हणून अडून बसला होता. गाडी
धुवून काही फायदा नाही परत धुळीने माखणार आहे हे किती तरी वेळा त्याला
सांगितलं पण गडी ऐकेचना. शेवटी म्हंटल जा धु तुझी गाडी, मी थांबतो इथेच
तुझी वाट बघत, मला नाही गाडी धुवायची. पण तेव्हा काय झालं कुणास ठाऊक,
साहेब लगेच निघण्यासाठी तयार झाले पण थोडं चिडूनच. त्याचा पारा काही उतरला
नव्हता. गाडीला किक मारली आणि गेला सुसाट पुढे निघून. मी आपला, तो दिसतोय
इतक्या अंतराने गाडी चालवत राहिलो. पण एक घोळ झाला. गाडी चालवताना माझ्या
लक्षात आलं कि मागच्या चाकात काही तरी आवाज येतोय. एकदा गाडी थांबवून
पाहिलं पण काही कळलं नाही म्हणून पुढे जाऊ लागलो. तुषार एव्हाना बराच पुढे
निघून गेला होता. मागच्या चाकातून आवाज येणे चालू होतेच. शेवटी एकदम खाड !!!
खाड !!! खाड्याक !!!! असला काही तरी भयंकर आवाज आला आणि माझा तोल थोडा गेला. गाडी
सांभाळली, लगेच थांबलो आणि नीट पाहू लागलो. सगळीकडे पाहताना नजर चेन वर
गेली. तर तिच्यावर थोड्या थोड्या अंतराने कापडाचे तुकडे अडकलेले दिसले.
नक्की काय झालं ते मला समजलं होतं. सॅडल बॅगचा एक बंद चेन मध्ये अडकून
तुटला होता आणि त्याचे तुकडे तुकडे होऊन सगळ्या चेन मध्ये अडकले होते. हळू
हळू चाक फिरवत एक एक तुकडा काढून टाकला. एक दोन तुकडे राहिले होते
तेव्हड्यात तुषार परत येताना दिसला. तो आल्यावर झाला प्रकार सांगितला. तो
आला तेव्हा त्याचा राग कमी झाला होता. पुन्हा सगळी चेन
व्यवस्थित बघितली आणि एकही तुकडा मागे राहिला नाही याची खात्री केली.
गाडीवर टांग टाकली आणि आम्ही दोघे पुढे निघालो. कारगिलला पोहोचे पर्यंत
५-५.३० झाले होते. तुषार म्हणाला जाऊ पुढे द्रास पर्यंत. पोहोचू आरामात. मग
काय पेट्रोल भरलं आणि आम्ही लागलीच द्रास कडे प्रस्थान केले. कारगिल सोडल्यावर द्रासकडे जाताना एके ठिकाणी "Enemy is watching you" हा
बोर्ड आहे, असं एका मित्राने सांगितलं होतं. रस्त्यावरिल पाट्यांकडे लक्ष
ठेवूनच होतो. नदी साथीला होतीच. आम्ही दरीतून पुढे पुढे जात होतो आणि
आमच्या उजव्या बाजूला नदी होती. रस्ता तसा बरा होता. असेच जात
असताना आम्हाला तो बोर्ड दिसला. तो बोर्ड दिसला तेव्हा पासून नदीच्या
पलीकडील डोंगरावरून खरच आपल्याला कोणी पाहत असेल का? हा विचार करू लागलो
पण कोणीच दिसलं नाही. तोच विचार डोक्यात घोळत असताना दरी संपली आणि डोंगररांग लांब गेली. अंधार पडायला लागला तेव्हा आम्ही द्रासला पोहोचलो. द्रास
!!! भारतीय सिमेवरचं सर्वात महत्वाचं ठिकाण. १९९९ मध्ये जिथे भारताने,
पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिकून घुसखोरांना हाकलून लावले ते ठिकाण.
द्रास
मधील हुतात्मा स्मारक पाहण्याचं आधीच ठरलेलं होतं पण ते दुसऱ्या दिवशी.
संध्याकाळचे ७ वाजले होते त्यामुळे आधी राहण्याची आणि पोटपाण्याची सोय
बघायला प्राधान्य होते. JKTDCची सोय होती पण तिथे आधीच बुकिंग फुल होतं.
एका शाळेची ट्रीप आल्यामुळे एकही खोली रिकामी नव्हती. त्याच्याच
सांगण्यावरून जवळच्याच एका रस्त्यावरील हॉटेलचा पत्ता
मिळाला. लगेच रस्त्यावर रात्रभर गाडी लावायची हा विचार मनात डोकावला आणि
गाडीच्या सुरक्षेचं काय हा मोठ्ठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. तिथल्या
तिथेच संस्थापाकाला विचारणा केली तर तो म्हणाला काही होत नाही. काळजी करू
नका. पण आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून शेवटी म्हणाला पाहिजे असेल तर
आमच्या इथे आत आणून गाडी लावा. मी परवानगी देतो. तो असं म्हणाला तेव्हा बरं
वाटलं आणि आम्ही हॉटेलचा पत्ता घेऊन तिथून बाहेर पडलो. JKTDC पासून ते
हॉटेल जेमतेम ५०० मीटर वर असेल. गाडी लावून तुषार रूम पाहायला गेला. थोडा
निराश होऊनच परत आला. पण काय करणार? नाईलाज होता म्हणून आम्ही रूम बुक
केली. गाडी कुठे लावायची त्याला विचारलं तर हॉटेलवाला म्हणाला लावा इथेच
बँकेच्या समोर. काही होत नाही. समोर पोलिस स्टेशन आहे. रात्रभर एक पोलिस
बाहेर खुर्ची टाकून बसलेला असतो. काळजी नका करू. काही होत नाही
गाडीला. हॉटेल मालकाचं म्हणणं पटलं आणि घेतल्या गाड्यावर. समान सोडून वर
जाऊन बघितलंतर रूम एकदम अंधारी. त्या १० X १० च्या अंधाऱ्या रूम मधे
मिणमिणत्या बल्बच्या उजेडात रात्र काढायची होती. सगळं अवरल आणि
फेरफटका मारायला बाहेर पडलो. हॉटेल जरी न आवडणारं असलं तरी हॉटेलचा मालक
मात्र चांगला वाटला. माणुसकी नावाची चीज होती त्यात अस वाटलं. रूम
मधून खाली आलो आणि पाणी प्यायला मागितलं. एक मुलगा लगेच शेजारिच जमिनीवर
असलेल्या नळी मधून पाणी भरून घेऊन आला. पुढे.
मालक: ये जमीन से निकाली नेहर का पानी है! मिनिरल वाटर से भी अच्छा है!
मी: हां वो तो है! लेकिन उस नली को बंद क्यो नाही करते!
मालक: कोई जरुरत नही!. पुरा सिझन चालू राहा फिर भी पानी आना बंद नही होगा!
मी (मनात): कसं होईल. एवढा बर्फ वितळत असतो. चुकून जास्त वितळला तर पाणीच पाणी चोहीकडे म्हणावे लागेल तुला.
मी (वास्तवात): तो हम लोग गाडी धो लेते है! चलेगा क्या ?
मालक: हां हां जरूर, क्यो नही !
बास
आम्हला हेच हवं होतं. लगेच वर जाऊन चाव्या घेऊन आलो. दोघांनीही
आपापल्या गाड्या धुवून घेतल्या. गाड्या धुवून झाल्यावर दोनीही एकदम जवळ जवळ
लावल्या. मी एक मोठी चेन आणि कुलूप घेऊन आलो होतोच. घातली दोनीही
गाड्यांच्या चाकामधे साखळी आणि लावलं कुलूप. एकतर समोर एक पोलिस बसलेला आणि
शिवाय साखळी घालून कुलूप लावलेलं. गाडी आता आमच्या नकळत कुठेही जाणार नाही
याची शाश्वती झाली. हे सगळं झाल्यावर आम्ही फिरायला गेलो. येताना एका STD
मधे जाऊन घरी ख्याली खुशाली कळवली आणि ऐकून पण घेतली. पुन्हा हॉटेल वर आलो.
जेवलो आणि झोपलो.
सकाळी जाग आली ती रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकच्या आवाजानेच. खिडकीतून बाहेर डोकावलं तर समोर पोलिस स्टेशनच्या मागे भला मोठ्ठा डोंगर दिसला. वरती असलेल्या छोट्या छोट्या शिखारांमुळे उन सावलीची नक्षी तयार झालेली. लगेच ती कॅमेरा मध्ये साठवून घेतली. पटकन सगळं आवरलं आणि आम्ही बाहेर पडलो. हुतात्मा स्मारक बघायला पुन्हा उलटा ६ km मागे गेलो. प्रत्येक भारतीयाने जाऊन बघावं असं ते स्मारक, १९९९ मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचं प्रतिक दिमाखात तिथे उभे आहे. आपले जवान प्रतिकूल परीस्थित कसे लढले, त्यांनी काय काय पावलं उचलली आणि यश मिळवून दिले याची शौर्यगाथा तिथे मांडलेली आहे. संग्रहालयात खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्यावेळच्या घडलेल्या घटना, आम्हाला एका सैनिकाने सांगितल्या. काल दिसलेल्या बोर्ड बद्द्ल त्याच्या कडे चौकशी केली तर म्हणाला तो असाच लावलेला आहे. LOC आणखी लांब आहे. चांगले २-२.३० तास तिथे सगळं बघण्यात गेले. तिथेच मग कॅन्टीनला
पोट भर नाष्टा केला आणि पुन्हा रूमवर आलो. हॉटेलचा हिशोब मिटवला आणि द्रास
मधून प्रस्थान केलं.
आजचा दिवस श्रीनगरच्या नावावर केलेला. श्रीनगर फार काही लांब नव्हतं. निवांत पोहोचणार होतो म्हणून आरामात गाडी
चालवत होतो. शेवटचं त्या निसर्गाला डोळ्यात साठवत पुढे जात होतो. परत या
डोंगर दर्यां मध्ये भटकायचा योग लवकर येणार नाही याची जाणीव व्हायला लागली
होती. दोनीही बाजूला उंचच उंच डोंगर आणि मधून जाणारे आम्ही दोघेच. छोट्या
छोट्या चढउतारावरून मस्त हेलकावे घेत चाललो होतो. हवे तिथे थांबून मजा लुटत
होतो. बघता बघता जोझी'ला' पासला पोहोचलो. हा शेवटचा पास आहे. या पुढे
माणूस हळू हळू खाली उतरायला लागतो आणि समुद्रासपाटीच्या जवळ यायला लागतो.
जोझीला ला थोडा वेळ गेला आणि आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर एक सैनिक
वॉकी टॉकी घेऊन उभा राहिलेला दिसला आणि त्याने आम्हाला पुढे जाण्याचा इशारा
केला. आणखी पुढे गेलो तर सगळ्या मोठ्या गाड्या ओळीने थांबलेल्या
दिसल्या. गेट लागला होता. घाटात रस्त्यची रुंदी कमी असल्यामुळे आळीपाळीने
गाड्या वर किंवा खाली सोडतात. जोवर वरचा सैनिक खालच्या सैनिकाला सांगत नाही
तोवर. एकदा का वरच्या गाड्या खाली जायला लागल्या तर खालच्या गाड्या खालीच
थांबतात. हेच पुन्हा उलटं खालच्या गाड्या वर जायला लागलं कि करतात. यालाच
गेट लागणे म्हणतात. गेट लागला कि १-२ तास एकीकडच्या ड्रायवर लोकांना बसून
राहण्याशिवाय पर्याय नसतो. दुचाक्यांना याचा काही फरक पडत नाही. गेट
लागलेला असला तरी दुचाकीस्वरांना (स्वतःच्या जवाबदारीवर) दुचाकी सकट पुढे
जाऊन देतात. नेहमी प्रमाणेच कडेकडेने आम्ही एकदम पुढे गेलो. समोरून सैनिकी
ट्रकांची एक रांग वर येताना दिसली. आम्ही थोडे पुढे जायचो आणि जागा बघून
थांबायचो. एक दोन ट्रक पुढे गेले आणि जागा झाली कि पुन्हा पुढे जायचं. असं
करत करत आम्ही खाली उतरलो. खाली उतरताना पुढे सोनमर्गचा रम्य नजरा दिसत
होता. खाली उतरलो आणि आरामासाठी एके ठिकाणी थांबलो.
नदी पुन्हा आमच्या साथीला आली होती. थोड्या वेळाने तिथून निघालो. प्रवासात
आम्ही मागे पुढे नेहमीच व्हायचो. कधी तो पुढे कधी मी. या वेळी मी पुढे होतो
पण तो आरशात दिसत राहील, एवढं अंतर ठेवून होतो. रस्त्यावर मेंढरं घेऊन एक
जण चालला होता. मेंढररांनी सगळा रस्ता व्यापून टाकला होता. गाडीचा कर्कश
हॉर्न वाजवून सुद्धा ती बाजूला होत नव्हती. कसा बसा कडे कडेने मी त्यातून
पार झालो. आरशात पाहिलं तर तुषारची तीच परीक्षा चालू होती. त्याची वाट
बघत मी हळू हळू पुढे जात राहिलो. तर पुढे पुन्हा तेच. रस्त्यावर सर्वत्र
मेंढरांच राज्य होतं. एपिसोड पुन्हा रिपीट टेलीकास्ट झाला. पण या नादात,
माझी तुषारवर असलेली नजर हटली. मी पुढे गेलो तरी याचा पत्ता नाही. हा गडी
पुन्हा अडकला असणार, येईल थोड्या वेळात असं समजून मी पुढे जात राहिलो. पुढे
आणखी एक प्राणी रस्ता अडवून आरामात चालला होता. यावेळी घोडे होते. समोरून
ट्रक आलेला त्यामुळे रस्ता जाम झाला होता. तो घोड्यांचा तांडा ओलांडून मी
पुढे जात राहिलो. पुन्हा त्याच समजात कि तुषार येईल थोड्या वेळात. पण कसलं
काय...??? तुषारचा कुठे पत्ताच नव्हता. आरशावर नजर ठेवत मी चांगला १-२ km
पुढे गेलो पण हा आलाच नाही. शेवटी मग त्याची वाट बघत एके ठिकाणी थांबलो. ५,
१०, १५, २० मिनिटे झाली तरी हा गायब. मग मात्र माझा संयम संपला आणि मी
गाडी मागे फिरवली. त्याला बघत बघत पुन्हा उलटा जाऊ लागलो. डोक्यात शंभर
विचार चालू झाले. कुठे गेला असेल? पडला कि काय कुठे? नदीत तर पडला नसेल?
अशा ढीगभर विचारांनी काहूर माजवलं डोक्यात. वाटेत एका गुराख्याला माझ्या
सारखा आणखी एक प्राणी दिसला का याची चौकशी केली पण नाहीच. बाबाजी कुठे गेले
होते काय माहिती? शेवटी ठरवलं. जिथे आरमासाठी थांबलो होतो तिथ पर्यंत
पुन्हा जायचं आणि हळू हळू शोध घेत पुन्हा यायचं. सुसाट निघालो आधीच्या
थांबलेल्या जागेकडे. तिथ पर्यंत पोहोचलो. तिथे दोन सैनिक होते त्यांच्या
कडे विचारपूस करत असतानाच त्यांनी उलट्या दिशेने माझ्या मागेच बोट दाखवले
आणि मला तुषार दिसला. शिव्यांचा वर्षाव करतच त्याच्याकडे गेलो. तिथे
पोहोचलो आणि पुढे:
मी: कुठे तडफडला होतास बे ?
तुषार: रिवर राफ्टींग बघत रिसोर्टपाशी थांबलो होतो. तुला परत उलटं जाताना पाहिलं आणि ते सोडून तुझ्या मागे आलो.
मी: साल्या !!! इथे माझी वाट लागलेली. कुठल्या दरीत जाऊन उलथलास हे पाहायला परत आलो होतो.
तुषार:
अबे!!! होर्न वाजवत तुला थांबण्याचं सांगत होतो. त्या हॉर्नचा आवाज ऐकून
रस्त्यावरची लोकं पण वैतागली. पण तुझ लक्ष कुठे होतं? सुसाट उलटा चालला
होतास.
मी: तू कुठे धडपडलास ते बघायचं कि माझ्या मागे कोण हॉर्न बडवत येतोय ते बघायचं.
तुषार: फुकट ५ km मागे यायला लावलंस.
मी: आता घरी जाता जाता असले उद्योग नको. उगा डोक्याला ताप साला !!!
अजूनही
बरच तोंडसुख घेतलं त्याच्यावर पण असो... आम्ही परत निघालो. सोनमर्ग मध्ये
पोहोचलो होतोच. एक मस्त चहा घेऊन मग पुढे जावं यावर एकमत झालं म्हणून तिथे
थांबलो. एका टपरी वर चहाची ऑर्डर दिली आणि तिथलं सौंदर्य न्याहळत बसलो
शिवाय गप्पा हि चालू होत्याच. सोनमर्ग खरच मनाला भावलं. पुन्हा इथे घरच्या
मंडळींना घेऊन चांगले ४-५ दिवस यायलाच पाहिजे असे वाटून गेले. आणखी थोडा
वेळ तिथे गेला आणि मग आम्ही तिथून निघालो. थोडेच पुढे गेलो असू तेव्हा
तुषार म्हणाला इतक्या दिवसात नदी एवढ्या जवळ असताना आपण एकदाही थांबून नदीत
उतरलो नाही. हि वेळ पुन्हा येणार नाही. लगेच थांबलो. जागा बघून गाड्या
बाजूला लावल्या आणि उतरलो नदीत. थोडा वेळ घालवला आणि निघालो. बाहेर पडताना
मी काही गोटे आठवण म्हणून बरोबर घेतले (घरी असलेल्या फिशटँक मधे ठेवलेत).
आता कुठेही थांबायचं नव्हतं. रस्ता झक्कास होता. दऱ्या डोंगर बघत,
वळणावळणाच्या चकचकीत रस्त्याने वारा कापत पुढे जात रहाणे. अहाहा !!! काय
सुख होतं ते. तिथून निघाल्यापासून एकाही गाडीला आम्ही ओवरटेक करू दिले
नाही. श्रीनगर जवळ आलं तेव्हा थोडा वेग मंदावला. खूप दिवसांनंतर एक
मस्त राईड मिळाली.
श्रीनगर मध्ये खूपच लवकर पोहोचलो. श्रीनगर मधे
राहणार असाल तर नगिन लेकला रहा असा सल्ला आम्हाला लेह मध्ये भेटलेल्या
राहुल ने दिला होता. तस चौकशी करत आम्ही नगिन लेकला पोहोचलो. तिथे हॉटेल
असं एकही नव्हत. सगळ्या हाउसबोट्स. रेट विचारला तर १५०० सांगितलं. आयला
८-१० तास घालवायचे त्यासाठी १५०० जास्तच होते. नुसता मुक्कामच तर करायचाय.
उद्या सकाळी इथून निघणार आहोत. कशाला फुकट १५०० घालवायचे? हाउसबोट मधे
राहायची हौस बायको बरोबर पूर्ण करू असा विचार केला आणि तिथून निघालो. वेळ
पुष्कळ होता. आता चौकशी सुरु झाली दलसरोवराची. गल्ली बोळातून मार्ग काढत
काढत तिथे पोहोचलो. वाटलं जगप्रसिद्ध दल सरोवराजवळ मुक्काम करू आणि होडीने
त्यात फिरू. पण नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. सोनमर्गवरून
आल्यामुळे त्या सरोवराजवळ आम्ही उत्तरेकडे पोहोचलो होतो. हॉटेलची
विचारपूस केली तर एकही गड्याला नीट सांगता येईना. सरोवराच्या वरील अर्धगोला
भोवती ४-५ वेळा फिरून झालं पण हॉटेल काही मिळेना. एका टोकाला विचारलं तर तो
दुसऱ्या टोका कडे असेल म्हणून सांगायचा. ५-६ km गाडी चालवून तिकडे गेलो तर
तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात परत उलटे जावा असं उत्तर मिळालं. पुन्हा उलटं
गेलो. फिरून फिरून भोपळे चौकात अशी गत झाली. इकडचे लोक तिकडची माहिती
सांगायचे आणि तिकडचे लोक इकडची माहिती सांगायचे. एकी कडून दुसरीकडे करण्यात
दोन तास गेले. तिथल्या (मंद) माणसांना एकही हॉटेलचा पत्ता नीट सांगता
येईना. एवढ्या मोठ्या सरोवराजवळ एकही हॉटेल नाही मिळत म्हणून दोघांचीही
चिडचिड झाली होती. शेवटी ठरवलं मरू देत सरोवर. आपण हायवेलाच थांबू आणि
सकाळी लगेच निघू. म्हणून मग दक्षिणेकडे मोर्चा वळवला. रत्यावर जाताना पाटी
दिसली 'दल गेट'. पुढे जाऊन बघतो तर काय हॉटेलची मोठी रांगच होती.
ओळीने भरपूर हॉटेल्स. अगदी पाहिजे तशी. शिवाय सरोवरामध्ये हाउसबोट्स पण
ओळीने लागलेल्या.
|
हाउसबोट्स |
आयला 'दल गेट'ला जावा असं सागायला त्यांची काय जीभ जड झाली होती कुणास ठाऊक? एक दोन हॉटेल्स बघितले आणि आम्हाला ५०० रुपड्यांमध्ये एक चांगली रूम
मिळाली. जीव भांड्यात पडला. पण या सगळ्यात २-२.५ तास गेले त्यामुळे दल
सरोवरात हिंडायचे राहून गेले. झटपट सगळं आवरलं आणि लेक भोवती फेरफटका
मारायला निघालो. हाउसबोट्सच्या एजंट्सचा सुळसुळाट झालेला अनुभवला. कडेकडेने
फिरत असताना १० जणांनी हाउसबोट्स पाहिजे का? हा प्रश्न विचारला. त्यांना
नको नको म्हणताना नाकी नऊ आले. अखेर आम्ही परत माघारी फिरलो आणि एका हॉटेल
मध्ये जेवायला गेलो. मस्त पंजाबी थाळी होती. कडाडून भूक लागली होती. दणकून
हाणले सगळे पदार्थ आणि तृप्त होऊन तिथून बाहेर पडलो. पुन्हा दलच्या कडेने
चक्कर मारत हॉटेलवर आलो. चक्कर मारताना घरच्या रिपोर्टिंगच काम उरकून
घेतलं. दिवस मजेत संपला. झालेल्या प्रवासाची गोळाबेरीज करत झोपी गेलो.