'लेह' वारी, भाग ३



<< भाग २

सकाळी लवकर ५.३० लाच उठलो. रात्री झोपताना लाईट जी गेली होती ती परत आलीच नव्हती. लाईट गेली म्हणून झोपताना एक मोठ्ठा स्क्रूड्रायवर आणि हातोडी जवळ घेऊन झोपलो होतो. तुषारने पण जवळ हातोडी ठेवली होती. बरोबर आणलेल्या सामानाचा असा नाही तर तसा उपयोग. एक तर दुर्गम भाग, कधी कोण येऊन काय करेल याचा नेम नाही. रात्री एकदा जाग आली तेव्हा सगळं समान जाग्यावर असल्याची खात्री केली आणि पुन्हा निर्धास्त झोपलो. सकाळी उठल्यावर पटापट सगळं आवरलं आणि रखवालदाराला निघण्यासाठी सांगावा धाडला. तो आला तेव्हा सगळा हिशोब केला आणि ६.३०ला निघालो. सुर्यनारायणाने सगळीकडे वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. सकाळची कोवळी किरणे अंगावर घेण्याची खूप इच्छा होती पण गारवा इतका होता कि ती इच्छाच रहिली. निर्सर्गाच कोवळं रूप मनात आणि कॅमेऱ्यात साठवून पुढे पुढे जात होतो. सकाळी सकाळी आमच्या सोबतीला HPSTC (हिमाचलच  महामंडळ) बरोबर होतं. कधी ते पुढे कधी आम्ही पुढे असा खेळ चालू होता. अर्थात आम्ही जेव्हा कुठे थांबू तेव्हाच त्यांना पुढे जाण्याची संधी मिळायची.












जे आदल्यादिवशी केलं तेच चालू होतं. हवं तिथे थांबणे आणि डोळे भरून सगळं पहाणे. गाडीचा काहीही त्रास नव्हता. फक्त काही काही वेळा वेग कमी केला कि बंद पडत होती. कारण होतं हवेतील ऑक्सिजनची कमतरता. जसे जसे आपण वर जातो तस तस ते प्रमाण कमी होत जातं. मग एके ठिकाणी थांबून, तुषारने दोनीही गाड्यांचा एयर इन्टेक वाढवला. मग लागल्या एकदम डौलात चालायला. तुषार म्हणाला काल रोहतांगलाच हे करायला हवा होतं. तिथेहि मधे मधे गाडी बंद पडण्याचा जो त्रास झाला तो झाला नसता. असो...आता आलं ना लक्षात!!! झालं तर मग. प्रवास मजेत चालू होता. कधी बार्लाचाला आलं कळलच नाही. महामंडळ आमच्या आधीच येउन थांबलं होतं. नाष्ट्याचा स्टॉप आला म्हणजे नाष्टा हा केलाच पाहिजे. दोनच पर्याय उपलब्ध होते. ब्रेड ऑम्लेट आणि मॅगी. त्यातला मला एकच मॅगीचा पर्याय होता. मग काय मी हाणलं पोटभर मॅगी आणि तुषारने ब्रेड ऑम्लेट. टाकी फुल झाली. गाडीची टाकी फुल करण्याचा प्रश्नच नव्हता. महामंडळात प्रवास करणारे जवळपास सगळेच पर्यटक होते. एका ग्रुप बरोबर गप्पा सुरु झाल्या. आम्ही सरावलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आणि इतर गप्पा झाल्या. 'लेह'च्या जवळ पास हिंडायच असेल तर परवानगी घ्यावी लागते हे माहितच होतं. शिवाय 'लेह' मधलं ते कार्यालय, जिथे परवाना मिळतो ते शनिवारी अर्धवेळ आणि रविवारी पूर्णवेळ बंद असतं. आजचा दिवस होता शुक्रवारचा. महामंडळ त्याच दिवशी 'लेह'ला पोहोचणार होतं आणि आम्ही शनिवारी पोहोचणार होतो म्हणून मग परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे आम्ही एकाला दिली आणि परवाना काढण्यासाठी सांगितलं. ते पुढे निघून गेले. आम्ही राहिलो मागे. निवांत आराम करून निघालो. आता पुढे शब्दात वर्णन करण्यापेक्षा फोटोच बघा..
































 सगळं काही मनात साठवत पुढे पुढे जात होतो. आजही तो रस्ता, तो निसर्ग डोळ्या समोर उभा असल्यासारखा भासतो इतका तो भिनला आहे. तर पहाता पहाता आम्ही 'सरचू' (एक छोटंसं गाव) क्रॉस केलं आणि गाटा लुप्सच्या पायथ्याशी आलो.

गाटा लुप्स 
 एक एक वळण घेत वर चढत होतो. मधेच एके ठिकाणी आमचे साहेब थांबले. फोटो वगैरे काढून झाल्यावर निघताना चांगला रस्ता सोडून आमच्या साहेबांना शॉर्टकट मारण्याची हुक्की आली. मी नको म्हणत असताना सुद्धा गडी घुसला मातीच्या रस्त्या मधे. मग मी हि घुसलो, दुसरं काय करणार ?, ठरवून जे आलो होतो!!! काहीही झालं तरी जिकडे जायचं तिकडे बरोबर जायचं. थोडंच वर गेल्यावर गाडी मातीत घुसायला लागली. चालवता चालवताच तुषार खाली उतरला आणि चालू गाडी (पहिल्या गियर मधे) ढकलू लागला. अखेर तो दमला आणि थांबला. तो थांबला होता त्याच्या बाजूनेच मी पुढे वर गेलो पण एके ठिकाणी मलाहि तेच करावं  लागलं. खाली उतरून गाडी ढकलू लागलो. टायर मातीत गेल्यामुळे दिसतही नव्हता. मी पण दमलो आणि थांबलो. आम्ही होतो १४००० - १४५०० हजार फुटावर. दम लागण्याचा मुख्य कारण होतं हवे मधील प्राणवायूची कमतरता आणि आम्ही त्या परीस्थित केलेले नाहक परिश्रम. १५-२० फुटाच्या अंतराने आम्ही दोघेही थांबलो होतो. ते सुद्धा जमिनीला ५० - ६० अंश कोनात मातीत फसलेली गाडी धरून. सगळी माती भुसभुशीत असल्यामुळे गाडी स्टँडलाही लावता येत नव्हती. इतक्यात महामंडळ चांगल्या रस्त्याने आमच्या पुढे गेलं. आम्ही  ५ मिनिटे दम खाल्ला आणि पुन्हा प्रयत्न चालू केला. पहिल्याच प्रयत्नात तुषारने पूर्ण ताकद लावली आणि कसेबसे माझ्या शेजारून गाडी ढकलत ढकलत वर गेला. वर गेल्यावर गाडी लावली आणि डोकं धरून बसला. त्याच डोकं दुखायला लागलं होतं. मला सांगितलं त्याने, पण मी काहीच करू शकत नव्हतो. हतबल होतो. 
आम्ही मारलेला शॉर्टकट
माझी गाडी काही केल्या हलायला तयार नव्हती. कारण मागच्या चाकाच्या पुढे माती मधे एक न दिसणारा पण जाणवणारा मोठ्ठा दगड होता. धड मला गाडी पुढे नेता येत नव्हती आणि बाजूला ओढताहि येत नव्हती. खाली परत उलटं जाणे म्हणजे गाडीबरोबर गडगडत जाणे अशी परिस्थिती होती. वरून तो म्हणाला थांब १० - १५ मिनिटे. बर वाटलं कि मी येतो तिथे. पुन्हा थांबलो. कालच्या सारखे खांदे भरून आले होते. थोडा वेळ गेल्यावर तो खाली आला. स्टार्टर मारला आणि गाडी चालू केली. जर गाडीला बटन स्टार्टर नसता तर?? बापरे!!! दुसऱ्या बाजूने किक मारायला तिसरा जण कुठून आणणार होतो आम्ही.....जाऊदेत कल्पना पण नको त्याची. मग तो मागून आणि मी बाजूने अशी चालू गाडी ढकलत वर नेली. माझही डोकं दुखायला लागलं होतं पण तीव्रता त्याच्या इतकी नव्हती, कमी होती. पुन्हा आम्ही १५ मिनिटे थांबलो. आराम केला, जरा बर वाटायला लागलं म्हणून मग निघालो. तुषारच डोकं दुखायचं थांबलं नव्हतच. ती फक्त पुढे काय होणार याची चाहूल होती. प्रवास सुरु झाला. १५-२० मिनिटे गाडी चालवल्यावर पुन्हा थांबलो. त्याने ग्लुकोस घेतलं, गोळी घेतली. मग थोडा आराम केला आणि निघालो. मी पुढे पुढे जात होतो मागे वळून पाहतो तर तुषार मागे नाही. लगेच थांबलो. आमचा हिरो कुठे दिसतोय का पाहू लागलो. डोंगरावरील रस्ते दिसत होते. 
डाव्या कोपऱ्यात रस्त्यावर काळा ठिपका
परत जावं अस वाटत असतानाच एक काळा ठिपका पुढे पुढे येताना दिसायला लागला. मधेच तो ठिपका थांबला. तो तुषार होता. तो का थांबलाय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. कॅमेरा लेन्स मधून झूम करून पाहिलं तेव्हा कळलं कि त्याचा त्रास अजून गेला नाही. डोके दुखीने त्याला सोडलं नव्हतं. मग मी तो येई पर्यंत तिथेच थांबलो. बऱ्याच वेळाने तो आला. जेव्हा आला तेव्हा त्याला बर वाटतंय असं दिसत होतं. पुढच्या प्रवासाचा आमचा वेग मंदावला. हळू हळू पुढे जायला लागलो. आम्ही मारलेला शॉर्टकट खूप महागात पडला होता.






















'लाचुंगला' पास केला आणि 'पांग'ला पोहोचलो. बघतो तर तिथे महामंडळ थांबलेलं होतच पण आम्ही पोहोचताच ते पुढे निघाले. आम्ही चहा प्यायला, १०-१५ मिनिटे थांबलो आणि निघालो. मानालीतून निघाल्या नंतर, जीस्पा पहिला तर 'पांग' हा बऱ्याच जणांचा दुसरा मुक्काम असतो पण आम्ही तिथे दुपारी २.०० लाच पोहोचलो होतो. मी एका मित्राला (जो आधी येउन गेला होता) विचारून ठेवलं होतं त्याच दिवशी पुढे 'उप्शी'ला पोहोचण्याबद्दल  बद्दल आणि त्याने आरामात पोहोचाल असं सांगितलं होतं. तुषारला काही त्रास होत नव्हता म्हणून मग पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
'पांग' सोडलं कि पुढे लागातात 'मूर प्लेन्स ' (उंची साधारण १५५०० फुट). एक लांब आणि भरपूर रुंद पठार. त्या पठारावर काही ठिकाणी आहे काळा डांबराचा पट्टा आणि बाकी ठिकाणी कच्चा रस्ता ज्याचा काही उपयोग नाही. जेव्हा आपण 'मूर प्लेन्स' वर गाडी चालवतो तेव्हा ध्येय फक्त एकच असतं. समोर दिसणारा डोंगर पायथा. अख्या पठारावर तुम्हाला वाट्टेल तिथून वाट्टेल तशी गाडी चालवायची मुभा असते. जेव्हा आम्ही 'मूर प्लेन्स' ओलांडायला सुरुवात केली तेव्हा १५ km वगैरे एकदम चांगला रस्ता होता अशा वेळेला आधीच एवढे दगड धोंडे खाल्यावर उगाच दगड धोंड्यातून कोण जाईल ? मस्त सुसाट गेलो तेवढा रस्ता, पण नंतर रस्ता संपला आणि सुरु झाला रस्ता शोधण्याचा खेळ. रेफरन्ससाठी होता मधोमध असलेला निरुपयोगी कच्चा रस्ता आणि इतरत्र आधी गेलेल्या वाहनांच्या टायरचे ठसे. पठारावर बरीच झुडुपं आणि भुसभुशीत माती होती. झुडूपांमधून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो. मातीत दोनीही चाकं रुतायची पण तसेच पुढे गाडी दामटत होतो. एव्हाना अशा प्रदेशात गाडी चालवायला सरावलो होतो. कधी खाली उतरून गाडी ढकलायची, कधी रस्ता चुकला (चुकला म्हणजे पुढे जाण्यास जागा नसायची) आणि अडकलो कि पुन्हा थोडं मागे जाऊन नवीन रस्त्याने पुढे जायचं असं चालू होतं. डोंगर माथ्यावर पाणी भरलेल्या ढगांनी गर्दी केलेली दिसत होती. पावसाचा सावट जाणवू लागलं. पण तो नुसतीच हूल देत होता, बरसत नव्हता. 











  मजेत डोंगर पायथ्याजवळ पोहोचलो आणि पुन्हा तुषारला डोकं दुखायचा त्रास सुरु झाला. काय करावं ते कळेना? आम्ही बरेच पुढे आलो होतो त्यामुळे मागेहि जाता येईना. पुढेच जात रहाणे हा एकच पर्याय होता. पुढे जे पाहिलं गाव लागेल तिथे थांबायचं ठरवलं. डोंगर चढून पुन्हा तो उतरल्या नंतर मग गाव मिळण्याची अशा होती. घाट चढायला सुरुवात केली. आमचा वेग खूपच कमी झाला होता. तसही रस्ता नावाचा प्रकार नव्हताच. होते फक्त दगड, धोंडे आणि मुरूम. हळू हळू पुढे जात होतो. मधे मधे BRO कामगार दिसायचे. त्यातल्याच एकाला थांबून विचारलं तर म्हणाला डोंगर उतरलात कि आहेत दोन तीन छोटी गावं, किती लांब विचारलं तर उत्तर आलं इथून टांगलांगला  टॉप (१७५०० फुट) ६ km आणि तिथून पुढे खाली १५ km. मी ते उत्तर जसंच्या तसं तुषारला सांगितलं. टांगलांगला टॉप आम्हाला दिसतच होता.
आम्हाला लवकरात लवकर जवळचं गाव गाठणे आणि मुक्काम ठोकणे एवढच लक्ष होतं. जगातला दुसरा सर्वात उंच रस्ता आल्यावर आम्ही थांबलो. पाहतो तर 'रुम्त्से' (डोंगर पायथ्याच गाव) आणखी २८ km. ते वाचून तुषारच अवसानच गळालं. पुढे
तुषार: मी इथून पुढे गाडी चालवू शकत नाही. इथे पर्यंतच कसा आलोय ते माझं मला माहिती.
मी: अजून थोडा धीरधर. आता डोंगर उतार आहे. जस जसं खाली जाऊ तस तसं बरं वाटेल तुला.
तुषार: आजची रात्र इथेच राहू, उद्या सकाळी जाऊ.
मी: शक्यच नाही, अशा या आड जागी एक तर राहायचं नाही आणि इतक्या उंच तर नाहीच नाही. आधीच इथे ऑक्सीजनची कमतरता, त्यात आणखी काही व्हायला लागलं तर काय करणार ? खाली जाऊ, पाहिलं ठिकाण मिळेल तिथे थांबू.
आणखीनही बरच काही बोलणं झालं पण आता आठवत नाही. शेवटी तुषार मला शिव्या घालत घालत खाली येण्यास तयार झाला आणि आम्ही निघालो. एक बरं होतं कि अंधार अजून झाला नव्हता. डोकेदुखीमुळे त्याचं डोकं ठिकाणावर नव्हत त्यामुळे त्याची बडबड चालू झाली. कुठून किती अंतर आहे याची आणखी तपशिला सकट माहिती का नाही काढली म्हणून माझ्या नावाने शंख चालू झाला होता. आणखीनही बरीच मुक्ताफळ उधळायला सुरुवात झाली. त्याच्या प्रत्येक वाक्यावर माझं एकच वाक्य ठरलेलं होतं. "तू आधी खाली चल, रूमवर गेलं कि काय शिव्या घालायच्या तेवढ्या घाल पण थांबू नकोस".
शक्य तितकं त्याला दरीच्या कडेला न ठेवता आतून गाडी चालवायला सांगत होतो आणि स्वतः दरीच्या बाजूने गाडी चालवत होतो. जेणे करून काही गडबड होऊ नये. एकदा तर हा थांबलाच आणि पुन्हा तेच चालू झालं. इतक्या लांब आलो, अजून काही पाहिलं नाही.. सविस्तर आठवत नाही आता पण एक ना अनेक गोष्टींची उजळणी करत बसला . अगदी कि पार मारामारी करतो कि काय अशी वेळ आली. मला त्याचा त्रास दिसत होता पण त्याला खाली सुखरूप घेऊन जाणे एवढी एकच गोष्ट साधायची होती म्हणून मग माझा ठरलेलं वाक्य मी पुन्हा पुन्हा त्याला ऐकवत होतो.  कसेबसे आम्ही खाली 'रुम्त्से' मधे आलो. एक रेसोर्ट दिसला आणि आत घुसलो. रूम आहे का विचारून पुढे सगळं समान काढून रूम मधे घेऊन गेलो. पण तिकडचा संस्थापक आला आणि रूम बुक्ड आहे म्हणून सांगू लागला. मी आधी का नाही सांगितलं म्हणून भांडत होतो आणि रूम सोडायला तयार नव्हतो. शेवटी तुषार म्हणाला जाऊदेत सोड, पाहू दुसरी कडे. पुन्हा सगळं समान बांधलं आणि निघालो. पुढे ३-४ km गेल्यावर एक छोट्या घरात विचारपूस केली आणि दोन रूम घेतल्या. तुषारने वाटेतच येताना "आपण वेगळ्या रूम घेऊ" म्हणून फतवा जाहीर केला होता. मी नको म्हणालो पण माझा नाईलाज होता. त्याला काहीही करून सुखरूप खाली आणणे भाग होतं. थांबलो तेव्हा तुषार तापला होता. त्याचं अंग चांगलंच भाजत होतं. हॉटेल वजा घर असल्यामुळे, गरम पाणी आणि जेवणाची सोय होती. तो फ्रेश झाला आणि लगेच झोपला. मी जेवणाची ऑर्डर दिली आणि STD ची माहिती विचारून फोन करायला बाहेर पडलो. घरी फोन करून सुखारूप असल्याची महिती दिली आणि परत रूम वर आलो. थोडा वेळ थांबल्यावर जेवण तयार झालं. तुषारला जाऊन उठवलं. अंगात ताप होताच. घरी फोन करून खुशाली कळवायला सांगितलं. आधी नाही म्हणाला पण थोडा आग्रह केल्यावर तयार झाला. त्याने पण घरी फोन करून सुखरूप असल्याचं सांगितलं आणि आम्ही परत रूम वर आलो. आता तुषार बराच शांत झाला होता. डोक्यातला ताप उतरला होता पण अंगातला ताप अजून उतरायचा होता. शांतपणे जेवलो आणि तुषारच्या रूम मधे गेलो. औषध घेतलं (आम्ही लागतील म्हणून बरोबर आणलीच होती) आणि तो झोपला. मीहि मग झोपायला गेलो. तो निवांत झोपला पण मी मात्र मधून मधून रात्री दर एक तासाला उठून त्याच्या कडे येऊन ताप चेक करत होतो. 
              पहाटे चांगली झोप लागली पण लगेच सकाळ झाली. ७.०० वाजले तरी तुषार अजूनही झोपलाच होता पण तेव्हा ताप उतरला होता. थोड्या वेळाने उठला. आता साहेब चांगले ताजे तवाने आणि नॉर्मल झाले होते. थोड्या वेळाने बाहेर आलो तर उन्ह वर यायला लागली होती. पाहतो तर तुषार गायब आणि त्याची गाडी पण गायब. लगेच घर मालकाला विचारलं, तर म्हणाला नाही गेला अजून. मग आहे तर कुठे आहे? शोधाशोध करू लागलो. मला वाटलं हे बेनं आणखी रुसून खरच निघून गेलं कि काय पुढे? पण नाही, साहेब होते. मागच्या अंगणात गाडी धुवत होते. नळाला भरपूर पाणी (थंडगार) होतं. मग काय मी पण माझी गाडी धुवून घेतली. पुन्हा घरात आलो आणि गप्पा सुरु झाल्या. गप्पा मारताना आदल्या दिवसाचा विषय निघाला तेव्हा साहेबांनी "जे झालं ते चुकीचं झालं म्हणून कबुली दिली". मी तर ते तेव्हा हि मनावर घेतलं नव्हतं आणि पुढेही घेणार नव्हतो. असो...गप्पा मारताना, घर मालकाने दोन कंदमूळ आम्हला खायला आणून दिली. नाव विचारलं  तर म्हणाला "शल्घम". बीटा सारखं दिसणारं ते पांढर कंदमूळ खात खात  गप्पा झाल्या. घरून निघताना प्रवासाची जी आखणी केली होती तिचा पार बट्ट्याबोळ झाला होता. रोज नवीन आखणी करायची वेळ आली होती आणि हे सगळं करून आम्ही आज 'लेह' ला पोहोचणार होतो. आरामशीर सगळं आवरलं, नाष्टा केला आणि १२.०० - १२.३० ला निघालो. 'लेह' काही फार लांब राहिलं नव्हतं. छान दिवस उगवला होता. त्या रम्य दुपारी आणि तो रम्य निसर्ग बघत शक्य तितक्या जोरात आम्ही 'लेह' कडे धावत होतो. दोनीही बाजूला अवाढव्य डोंगर, मधे दरीतून वाहणारी नदी आणि नदीच्या शेजारील रस्त्यावरून धडधड करत जाणारे आम्ही दोघे. मनाली नंतर पुन्हा दोन दिवसांनी आम्हाला नदीची साथ लाभली होती. एकदम मस्त वाटत होतं. कधी एकदा 'लेह'ला पोहोचतो असे झाले होते. जाता जाता वाटेत आम्हाला MH १४ ची गाडी घेऊन एक तरुण थांबलेला दिसला. आम्ही पुढे गेलेलो पुन्हा मागे वळलो आणि त्याला जाऊन भेटलो. गाडी पंक्चर झाली म्हणून तो थांबला होता.  मनाली कडे निघाला होता आणि गाडी ट्रक मध्ये टाकून नेण्यासाठी एखाद्या ट्रकची वाट बघत होता. त्याचा मित्र आधीच पुढे निघून गेला होता आणि हा एकटाच मागे राहिला होता. त्याला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आणि निघालो. हे असलं काही आमच्याबरोबर होऊ नये म्हणून आम्ही पुरेपूर काळजी घेतली होती आणि सगळीकडे एकत्रच प्रवास केला होता आणि करणार होतो.  तिथून निघालो आणि रमत गमत 'लेह'ला पोहोचलो. का कुणास ठाऊक पण 'लेह' पर्यंतच्या प्रवासात 'लेह'कडे जाणारे आम्ही दोघेच होतो. जे कोणी फटफटीवाले आम्हाला दिसले ते सगळे उलट्या दिशेने मनालीकडे जाणारे होते. जेव्हा डोकं जाग्यावर नव्हतं तेव्हा तुषारने त्याच्यावरही विशेष टिप्पणी केली होती. कसे का असेना आम्ही 'लेह' मधे पोहोचलो होतो. तिथे पोहोचलो तेव्हा काय वाटत होतं हे मला शब्दात सांगता येणार नाही. मस्त मार्केट मधे हिंडत हिंडत हॉटेल शोधलं आणि रूम बुक केली. आता पुढची घाई होती ती लवकरात लवकर परवानगी मिळवण्याची. आदल्या दिवशी ज्या हिरोला पावनागी काढण्यासाठी सांगितलं होतं त्याचा फोन लागत नव्हता म्हणून मग आम्हीच तडक 'लेह' कार्यालयात गेलो. जर परवानगी मिळाली नसती तर रविवारचा दिवस फुकट जाणार होता आणि ते आम्हाला नको होतं. ४.०० ला ते बंद होतं आणि आम्ही अगदी वेळेत ३.३० ला तिथे पोहोचलो. लगेच पैसे भरून ज्या ज्या प्रदेशात जायचय त्याची परवानगी काढली आणि परत आलो. भूक लागली होती म्हणून एका हॉटेल मध्ये गेलो. पंजाबी जेवण होतच (ते कुठे कधी नसतं का ?) पण आम्ही त्याला 'लेह' स्पेशल 'थूपा' आणायला सांगितलं. जिथे गेलोय तिथली स्पेशल डिश न खाऊन कसं चालेल? वेगवेगळ्या भाज्या आणि नुडल्स घातलेल्या थूपा वर मस्त ताव मारला आणि रूम वर गेलो. 






 फ्रेश झालो आणि पुन्हा हिंडायला बाहेर पडलो. तिथली लोकं  कशी राहतात, कशी बोलतात, तिथलं वातावरण अनुभवत हिंडत होतो. भर-भर चाललं कि लगेच धाप लागत होती. कोणताही काम करा पण एकदम हळू करा हे इथलं नवीन माणसासाठी सूत्र आहे. उगाच घाई गडबड केली तर दमून बेजार व्हाल. सेल लागलेली दुकानं जशी असतात तसं एक दिसलं आणि आम्ही आत घुसलो. दोन तीन कानातले आवडले. म्हंटल घेउयात महिला मंडळासाठी. भाव विचारला तर बाई म्हणाली कमीत कमी ८०० रुपये. मी आ करून तिच्याकडे पाहत होतो तर म्हणाली सगळे चांदीचे आहेत. लगेच विचार मनातून काढून टाकला आणि तिथून काढता पाय घेतला.   बाहेरच्या लोकांना बघून फालतू फालतू गोष्टींचे चढे भाव सांगत होते सगळेच. एके ठिकाणी किचेनचा भाव पहायला. बाईने सांगितला २०० रुपये. बराच वेळ हुज्जत घातली तेव्हा कुठे ती ५० रुपया वर आली आणि मी लगेच २०० ची चार घेतली. असेच उनाडक्या करत वेळ घालवला आणि रात्री एका हॉटेल मधे जेवलो. जेवण झाल्यावर शतपावली करताना घरी फोन करून सगळा रिपोर्ट सांगितला, रूम वर गेलो, हिशोब केला आणि झोपलो.

क्रमश:
              







1 comment:

  1. aa ha ha....sam what a journey..great..watching these photos..feeling like going through heavens..wish i could be the part of this...& now I am guessing whats next....:)

    ReplyDelete